विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन
By admin | Published: March 15, 2016 02:01 AM2016-03-15T02:01:10+5:302016-03-15T02:01:10+5:30
शिक्षणक्षेत्रातील विविध मागण्यांसाठी शिक्षक भारती, शिक्षक परिषद आणि प्रहार या शिक्षकांच्या संघटनांनी सरकारविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन, उपोषण आणि निदर्शने केली.
मुंबई : शिक्षणक्षेत्रातील विविध मागण्यांसाठी शिक्षक भारती, शिक्षक परिषद आणि प्रहार या शिक्षकांच्या संघटनांनी सरकारविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन, उपोषण आणि निदर्शने केली.
शिक्षकांना नवी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत शिक्षक भारतीच्या सदस्यांनी एका दिवसाचे धरणे दिले, तर जुन्या पेन्शनच्या मागणी आणि अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा व तुकड्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तत्काळ अनुदान देण्याची मागणी करत शिक्षक परिषदेने साखळी उपोषणास सुरूवात केली आहे. राज्यातील एकूण ३४६ महाविद्यालयांत पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे सिटीझन फोरम फॉर सॅनक्टीटी इन एज्युकेशन सिस्टम संघटनेने निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांनी खोटी माहिती शपथपत्रात भरल्याचे एआयसीटीईला शासनाने कळवावे, अशी मागणी करत निदर्शने केली. व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी करत ‘प्रहार’ने धरणे दिले. (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतरही आंदोलन सुरूच
शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी सांगितले की, विनोद तावडे यांसोबत परिषदेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यात काही मागण्या तावडे यांनी मान्य केल्या आहेत. मात्र काही प्रमुख मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. तरी आत्तापर्यंत शिक्षकेतर महामंडळ, ग्रंथपाल संघटना आणि प्राथमिक संघटनेने पाठिंबा दिला आहे.