Teacher Recruitment : नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती, ३० हजार पदे भरणार; दीपक केसरकरांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:23 AM2022-12-23T10:23:07+5:302022-12-23T10:23:32+5:30
राज्यात दिवाळखोरीची स्थिती नाही. मात्र कर्जाचा आकडा वाढला तर समस्या येऊ शकतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते.
गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीचे भिजत घोंगडे असताना राज्य सरकारने आता मोठ्या शिक्षक भरतीची घोषणा केली आहे.
पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. पुढील काही महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे आता राज्य सरकारने शिक्षक भरतीकडे पाऊल टाकले आहे. पोलीस भरतीप्रमाणेच शिक्षक भरतीदेखील गेल्या काही वर्षांपासून रखडलेली होती.
अर्थ खात्याने शिक्षकांच्या ८० टक्के भरतीला मंजुरी दिली आहे. त्यापैकी ५० टक्के पदे तातडीने भरली जाणार आहेत. राज्यात नवीन वर्षात तीस हजार पदे भरली जातील असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच कोणतीही शाळा बंद होणार नसून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याचा निव्वळ अफवा आहेत, असे केसरकर म्हणाले.
राज्याकडे पैसे नाहीत...
राज्याची अर्थव्यवस्था विकसनशील असून, दिवाळखोरीकडे नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल. ही योजना लागू केल्यास भविष्यात निवृत्ती वेतन देताना काढण्यात आलेल्या रकमेवर कर्जाचे व्याज देण्यासाठीही कर्ज काढावे लागेल. सध्या महसूल तूट जास्त आहे. त्यामुळे हे दायित्व आपण स्वीकारू शकत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.