शिक्षकांच्या बदल्या गाव-घराजवळ!

By admin | Published: October 12, 2015 05:27 AM2015-10-12T05:27:13+5:302015-10-12T05:27:13+5:30

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत राज्य शासनाने शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Teacher transfers near village-house | शिक्षकांच्या बदल्या गाव-घराजवळ!

शिक्षकांच्या बदल्या गाव-घराजवळ!

Next

अहमदनगर/औरंगाबाद : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत राज्य शासनाने शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारेच शिक्षकांच्या गावाजवळ नियमित आणि आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
‘लोकमत’ने चार दिवसांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. राज्यातील जवळपास १२ हजार शिक्षक सध्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे कुटुंब दूर असल्याने त्यांचा संसार विस्कटण्याच्या मार्गावर आहे. त्याबाबत ‘लोकमत’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल अखेर राज्य शासनाला घ्यावी लागली.
अहमदनगरमध्ये शिक्षकांच्या मेळाव्यात शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ‘मदत’ प्राणलीचा ओझरता उल्लेख केला. त्यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी भापकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी ‘मदत’विषयी माहिती दिली. समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे त्यांना कमीत कमी त्रास व्हावा, हाच आमचा उद्देश आहे. शिक्षकांचे कौटुंबिक स्वास्थ्य राखले जाईल. त्यांना त्यांचे गाव-घराजवळ आणण्यासाठीच ही प्रणाली आहे. प्रत्यक्ष काम कसे होईल, यासंदर्भात दोन दिवसांत सविस्तर माहिती दिली जाईल, असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना त्याच दिवशी पेन्शन मंजुरीचे कागदपत्रे आणि चेक मिळतील. जानेवारी महिन्यापासून राज्यात महिन्याच्या पहिल्या तारखेला शिक्षकांचे पगार करण्यात येणार असून जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शिक्षकांची प्रशिक्षणे बंद करण्यात आली असून मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरील बैठकांना आता ब्रेक लावून व्हिडीओ कॉन्फरन्सवर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher transfers near village-house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.