सरकारी पुरस्कार सोहळ्यावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:05 AM2018-09-04T00:05:24+5:302018-09-04T00:05:36+5:30
काही निवडक शिक्षकांना पुरस्कार द्यायचे, मात्र राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
यवतमाळ : काही निवडक शिक्षकांना पुरस्कार द्यायचे, मात्र राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. ‘सन्मान नको, पण समस्या आवरा’ असे निषेधपत्र शासनाला सोपविले जाणार आहे.
बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्य शासन १०८ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणार आहे. मात्र, या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्यभरातील शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने घेतला आहे. यासंदर्भात राज्य समन्वयक मधुकर काठोळे म्हणाले, राज्यातील शिक्षकवर्ग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. चर्चा, आंदोलनांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही सरकार समस्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिक्षक पुरस्कारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा आर्थिक तरतूद नसल्याचे निमित्त पुढे करून शासनाने या पुरस्कारांची संख्याही कमी केली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये रोष आहे. मात्र केवळ पुरस्कार देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यापेक्षा शिक्षकांना समस्यामुक्त करण्याची मागणी समन्वय समितीने केली आहे. २३ आॅक्टोबरच्या शासन आदेशानुसार शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळणे कठीण झाले आहे. २७ फेब्रुवारीच्या शासन आदेशाने बदल्या झाल्या मात्र या जीआरमधील त्रुटी वारंवार मागणी करूनही शासनाने दुरुस्त केल्या नाहीत. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी आंदोलनानंतरही प्रलंबित ठेवण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा शासन निर्णय असूनही वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. आॅनलाइन कामे करण्यासाठी केंद्र स्तरावर डाटा आॅपरेटरच्या नियुक्त्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोजक्या शिक्षकांचा सन्मान करण्यापेक्षा सर्व शिक्षकांना समस्यामुक्त करावे, अशी मागणी करत समितीने पुरस्कारांवर बहिष्कार जाहीर केला आहे.