अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक
By admin | Published: August 2, 2016 11:56 PM2016-08-02T23:56:03+5:302016-08-02T23:56:03+5:30
कारंजा तालुक्यातील लोहगाव शाळेतील प्रकार; ग्रामस्थांनी शिक्षकास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन.
कारंजा लाड (जि. वाशिम) : तालुक्यातील ग्राम लोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चवथीच्या वर्गात शिकणार्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत ईल चाळे केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. ही घटना कळल्यानंतर पळून गेलेल्या या शिक्षकाला ग्रामस्थांनी शेजारच्या गावातून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास सदर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोहगाव येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेतील शिक्षक शिवदास बाबाराव निंघोट (वय ५0) हा गेल्या पंधरा दिवसांपासून चवथीच्या वर्गात शिकणार्या दोन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता. या विद्यार्थिनींनी भीतीपोटी हा प्रकार घरी सांगितला नाही. मंगळवारी पुन्हा निंघोटने अश्लील चाळे केले, तेव्हा या विद्यार्थिनींनी घरी आई -वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती नायक हिरासिंग चव्हाण व अन्य ग्रामस्थांना दिली व शाळेवर पोहोचले. संतप्त ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी शाळेत येण्याची कुणकुण लागताच शिक्षक निंघोटने काजळेश्वर येथे पलायन केले. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून काजळेश्वर येथे पकडून पुन्हा शाळेत आणले. यासंदर्भात कारंजा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली. यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास शिक्षकाविरुद्ध भादंवि ३७६ (२) (ब) (फ) (आय) (म), बालकाचे लैंगिक गुन्ह्यापासून सरंक्षण २0१२ चे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावकरी संतप्त
सायंकाळी सात वाजता पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंंत या शिक्षकाची चौकशी सुरू होती. चार तास चौकशी केल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थांचा राग शांत झाला.