दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरी बसून तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:41 PM2020-03-25T17:41:09+5:302020-03-26T11:42:45+5:30
दहावी बारावीच्या परीक्षेचे पेपर आता शिक्षक घरी बसून तपासू शकणार आहेत. याबाबतची परवानगी राज्य मंडळाने परवानगी दिली आहे.
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे काम आता शिक्षकांना घरी बसून करता येणार आहेत. राज्य मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षकांनी घरी बसून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम शिक्षकांना घरी बसून करता यावे,यासंदर्भात राज्य शासनाने राज्य मंडळाला आदेश द्यावेत,असे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका होलो क्राफ्ट स्टीकर व बारकोड असल्याने कोणत्याही गोपनीयतेचा भंग होणार नाही. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी 'वर्क फ्रॉम होम' चा आदेश निर्गमित करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. राज्य शासनाने शिक्षक महासंघाची मागणी नुकतीच मान्य केली आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही परीक्षासुद्धा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन उत्तरपत्रिकांची तपासणी करणे शिक्षकांना शक्य होत नाही. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन योग्य कालावधीत पूर्ण न झाल्यास दहावी ,बारावीचा निकाल जाहीर करण्यास विलंब होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन शासनाने शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी तपासण्यास देण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन घरी बसून करता येऊ शकते.शासनाकडून याबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्व विभागीय मंडळांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांना घरी बसून उत्तरपत्रिका तपासता येतील. मात्र, सर्व शिक्षकांनी या उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळणे बंधनकारक आहे. शाळा महाविद्यालयांमधून शिक्षकांनी मोजून उत्तरपत्रिका घेऊन जाव्यात आणि मोजून जमा कराव्यात. तसेच उत्तरपत्रिका तपासताना आपल्या घरी बाहेरील व्यक्तीला प्रवेश देऊ नये,अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. तुकाराम सुपे,अध्यक्ष,पुणे विभागीय शिक्षण मंडळ
इयत्ता बारावीच्या सुमारे 60 टक्के उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित उत्तरपत्रिका शिक्षक घरी घेऊन आले आहेत. त्यामुळे सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी करून निकाल नियोजित कालावधीमध्ये जाहीर करण्यास अडचण येणार नाही.
- संतोष फाजगे, सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.