शिक्षकाने तोंडात छडी खुपसलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:50 AM2018-04-24T04:50:26+5:302018-04-24T04:50:26+5:30
चार शस्त्रक्रिया; १३ दिवसांपासून अन्नपाणी बंद
अण्णा नवथर ।
अहमदनगर : शिक्षकाने तोंडात छडी खुपसल्याने जखमी झालेला कर्जत तालुक्यातील दुसरीचा विद्यार्थी रोहन जंजिरे सध्या पुण्यातील रुग्णालयात आयुष्याशी झुंज देत आहे. त्याच्या अन्ननलिकेत संसर्ग झाल्याने तेरा दिवसांपासून अन्नपाणी बंद आहे.
पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत सात वर्षांच्या रोहनला शिक्षा करण्यासाठी शिक्षक चंद्रकांत शिंदे याने त्याच्या तोंडात छडी खुपसली. यात जखमी झालेल्या रोहनवर राशीन व बारामती येथे उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर ४ शस्त्रक्रिया झाल्या़
उपचार खर्चाचे काय?
रोहनचे वडील शेती करतात. त्याच्या उपचारावर आतापर्यंत पाच लाख खर्च झाले आहेत. या कुटुंबाची गटशिक्षणाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अद्याप दखलही घेतलेली नाही. काही लोकांनी तर शिक्षकाकडून पैसे घ्या व प्रकरण मिटवा असा तगादा लावला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी रोहनची भेट घेतली. त्याची अवस्था पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले.
शिक्षकाला अद्याप अटक नाही
शाळेतील अन्य पाच मुलांच्या तोंडातही शिक्षक चंद्रकांत शिंदे याने छडी खुपसल्याचे पालकांनी कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांना सांगितले. शिंदे यांनी तसा अहवाल जिल्हा परिषदेला दिला आहे. या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल होऊनही त्याला अटक झालेली नाही. रोहनचे वैद्यकीय प्रमाणपत्र आल्यानंतर गुन्ह्याची कलमे वाढवून पुढील कारवाई करू, असे कारण कर्जत पोलिसांनी दिले आहे.
छडी रोहनच्या श्वासनलिकेत गेल्याने नलिकेच्या मागील बाजूस मोठी इजा झालेली आहे़ आतापर्यंत चार शस्त्रक्रिया केल्या़ परंतु,जखमेतून हवा येऊन ती छातीत साचते़ त्यामुळे त्याला अन्नही गिळता येत नसल्याने प्रकृती चिंताजनक आहे़
- डॉ़ मुरारजी टी़ घाडगे, पुणे