पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांची सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2015 12:27 AM2015-09-16T00:27:19+5:302015-09-16T00:27:19+5:30
एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे
मुंबई : एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत झालेल्या या निर्णयाने लाखो शिक्षकांना पंचनाम्याच्या कामातून मुक्ती मिळणार आहे.
राज्याच्या गृह खात्याने १२ मे रोजी पंचनामा करताना लागणारा सरकारी कर्मचारी म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश काढले होते. त्याचप्रमाणे पंचनाम्याच्या कामात सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही त्या वेळी घेण्यात आला होता. मात्र जुने आदेश रद्द करताना पंचनाम्याचे काम नाकारलेल्या शिक्षकांवरील फौजदारी गुन्हेही मागे घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
बैठकीत पाटील यांच्यासोबत गृह विभागाचे मुख्य अधिकारी आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक परिषदेने शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी केली होती. परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच सरकारने जुने आदेश रद्द केल्याची प्रतिक्रिया परिषदेचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी दिली.