रातोरात शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही केले अपंग, मतिमंद

By Admin | Published: June 4, 2016 12:33 AM2016-06-04T00:33:48+5:302016-06-04T00:33:48+5:30

समानीकरणातून वाचण्यासाठी बारामतीचे दोन शिक्षक रातोरात एका संघटनेचे कोषाध्यक्ष झाल्याचा प्रकार ताजा असतानाच इंदापूरमध्ये काही शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही अपंग, मतिमंद केल्याचे उघडकीस येत आहे.

Teachers, including disabled, mentally challenged, have done their own children overnight | रातोरात शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही केले अपंग, मतिमंद

रातोरात शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही केले अपंग, मतिमंद

googlenewsNext

इंदापूर : समानीकरणातून वाचण्यासाठी बारामतीचे दोन शिक्षक रातोरात एका संघटनेचे कोषाध्यक्ष झाल्याचा प्रकार ताजा असतानाच इंदापूरमध्ये काही शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही अपंग, मतिमंद केल्याचे उघडकीस येत आहे.
पस्ौा व समानीकरणातून तालुकाबाह्य झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. १३ मे रोजी पेसा अंतर्गत इंदापूर तालुक्यातील ४ शिक्षक व उर्वरित तालुक्यांमधून २२ शिक्षक घेऊन त्या जागा भरण्यात आल्या. आदिवासी भागातील ‘खडतरपणा’मुळे या बदल्यांना शिक्षकांच्या संघटनांनी विरोध केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी शिक्षकांच्या संघटनांनी चर्चा केली. सर्व बदल्या रद्द करण्यात आल्या.
यानंतर गेल्या २८ तारखेला परत एकदा बदल्या झाल्या. एकूण ५७ जणांचा त्यामध्ये समावेश होता. त्या बदल्यांबाबत येत्या पाच तारखेला जिल्हा परिषदेत अंतिम निर्णय होणार आहे. त्याआधी झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी शिक्षक गण नानाविध क्लृप्त्या लढवत असल्याचे उघड होत आहे. शिक्षक स्वत: अपंग असल्याचा दाखला असल्यास त्यास दरमहा दोन हजार रुपये अपंग भत्ता मिळतो. प्राप्तिकरातून दरमहा दोनशे रुपये सूट मिळते. जर मुले अपंग वा मतिमंद असतील तर बदली रद्द होते. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असाल तरीही बदली टळते. हे बदली टाळण्याचे रस्ते मिळाल्याने त्याच रस्त्यांनी शिक्षकांची वाटचाल सुरू आहे. बोरी नावाच्या बागायती गावातील तब्बल तीस शिक्षकांनी अपंग असल्याचे बोगस दाखले आणले आहेत. ४५ ते ५० टक्के शिक्षकांनी स्वत: अपंग असल्याचे दाखले आणले आहेत. आठ ते दहा शिक्षकांनी मुले मतिमंद असल्याचे, तर पाच ते सात शिक्षकांनी मुले अपंग असल्याचे दाखले आणले आहेत. शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस असणाऱ्यांना बदलीतून सूट दिली जात असल्याने, या पदावर रातोरात नेमणुका होण्याची साथ सुरू झाली आहे. एका काँग्रेस पक्षप्रणित शिक्षक संघटनेमध्ये शिक्षक पती अध्यक्ष व त्याची शिक्षक पत्नी सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. दोन वर्षांत या संघटनेने प्रशासनाशी कसलाही पत्रव्यवहार केला नाही. संघटनेत इतर तालुक्यातील पदाधिकारी नाहीत. मात्र सरचिटणीस या पदामुळे त्या शिक्षिकेची बदली रद्द झाली आहे.
> बदलीस स्थगिती द्यावी
इब्टा नावाच्या संघटनेचे शिक्षक संघटना जिल्हास्तरावर काम करते. त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी इंदापूर तालुक्यातील आहेत. मात्र पदाधिकारी असल्याचे पत्र आणून एका शिक्षिकेने आदिवासी भागात झालेली आपली बदली रद्द केली आहे, असे प्रकार शरद कृष्णा काकडे या शिक्षकाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहेत. बदलीतून सूट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रांचा आधार घेण्यात आला आहे. बदलीस पात्र असणारे शिक्षक रातोरात संघटनांचे पदाधिकारी कसे झाले? हा सवाल उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी होईपर्यंत आपल्या बदलीस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
>इंदापूरला आज तालुका बदल्या
इंदापूर तालुक्यातील ९२ शिक्षकांच्या प्रशासकीय, तर ४६ शिक्षकांच्या विनंती बदल्या होणार आहेत. उद्या तालुक्यातील बहुतेक शिक्षक, त्यांच्या संघटना बदल्यांच्या मुद्द्यावर इंदापूर पंचायत समितीमध्ये येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पाच तारखेच्या निर्णयाआधी इथेच निकाल लावण्याचा त्यांचा इरादा आहे.

Web Title: Teachers, including disabled, mentally challenged, have done their own children overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.