शिक्षकांची वैद्यकीय बिले रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2017 12:54 AM2017-03-01T00:54:13+5:302017-03-01T00:54:13+5:30

पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची ३०० हून अधिक वैद्यकीय बिले वर्षभरापासून मंजुरीअभावी रखडली आहेत.

Teacher's medical bills paid | शिक्षकांची वैद्यकीय बिले रखडली

शिक्षकांची वैद्यकीय बिले रखडली

Next


बारामती : पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची ३०० हून अधिक वैद्यकीय बिले वर्षभरापासून मंजुरीअभावी रखडली आहेत. संबंधित बिले १५ दिवसांत मार्गी लावण्याची मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे केली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आजारपणासाठी तसेच आई ,पत्नी, वडील मुलगा, मुलगी या कुटुंबीयांना वैद्यकीय खर्च शासनाकडून मिळतो. यासाठी कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत सादर करतात. मात्र, ही वैद्यकीय बिले मंजूर करून घेताना शिक्षकांची प्रचंड दमछाक होते. अनेकदा बिलांच्या मंजुरी प्रक्रियेतील दिरंगाईने अनेक जण या योजनेचा लाभ घेणेच टाळतात.
अनेक शिक्षकांना त्यांच्या आजारपणासाठी शासनाने दिलेल्या योजनेमुळे रुग्णांना मदत मिळते. मात्र, पुणे जिल्हा परिषदेत मागील वर्षभरापासून ३०० हून अधिक बिले प्रलंबित आहेत. यामध्ये अनेक दुर्धर आजारी शिक्षकांचा समावेश आहे.
रक्ताचा कर्करोग, हृदयरोग, अपघाती शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांची बिले मंजुरीअभावी रखडल्याने शिक्षकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेने बिल मंजूर केल्यानंतरही अनेकदा पंचायत समिती स्तरावर निधी नसल्याच्या कारणास्तव शिक्षकांना पैसे मिळत नाहीत. दरवर्षी मार्चअखेर प्रलंबित खर्चासाठी शासनाकडून निधी मिळतो. यामुळे सदर प्रलंबित बिले तत्काळ मार्गी लागल्यास शिक्षकांना मार्चअखेर निधी मिळू शकतो. यासाठी वैद्यकीय बिलांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे; अन्यथा शिक्षकांची बिले पुन्हा वर्षभर रखडण्याची शक्यता आहे, अशी भीती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय बिलांच्या मंजुरीच्या दिरंगाईसाठी अनेकदा शिक्षण विभाग व आरोग्य विभाग एकमेकांकडे दोष दाखवीत असतात. काही शिक्षकांनी कुटुंबीयांवर चार वर्षांपूर्वी केलेला वैद्यकीय खर्चही मिळालेला नाही. काहींचे नातेवाईक आजारपणात मरण पावले, तरीही वैद्यकीय बिले अद्याप जिल्हा परिषदेत अडकलेली आहेत.
पंचायत समितीकडूनही अनेकदा बिलांमधील अपूर्ण बाबींची शिक्षकांना माहिती दिली जात नाही. तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून किरकोळ कारणास्तवही बिले पुन्हा पंचायत समितीकडे पाठविण्याचा अनुभव शिक्षकांना येतो. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले वेळेत न मिळाल्याने आजारपणाने पीडित असताना आर्थिक अडचणीमुळे शिक्षकांची प्रचंड गैरसोय होते. याबाबत जिल्हा परिषदेने कठोर उपाययोजना करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.(प्रतिनिधी)
>जिल्हा परिषदेत कागद झाले गहाळ
याबाबत बोलताना बारामतीमधील एका शिक्षकाने सांगितले की, वडिलांच्या आजारपणाचे बिल पाठवले. जिल्हा परिषदेत फाईलमधील कागद गहाळ झाले. पुन्हा नव्याने कागदपत्रे जमा केली. बिलाचा प्रवास मागील ३ वर्षांपासून सुरूच आहे. वडिलांच्या आजारपणातच समानीकरणात तालुक्याबाहेर बदली झाली. नंतर वडीलही दगावले. अद्यापही बिल मिळालेले नाही.
>आजारपणाला तरी सहानुभूती द्या...
अपघात, हृदयविकार, कर्करोग, पॅरालिसीस, विविध शस्त्रक्रिया यांसारख्या गंभीर आजारांनी पिचलेल्या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तरी मानवतावादी दृष्टीने सहानुभूती दाखवावी.
मार्च महिन्यात प्राधान्याने प्रलंबित वैद्यकीय बिले मार्गी लावावीत, अशी मागणी शिक्षक संघ पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी केली आहे.

Web Title: Teacher's medical bills paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.