शिक्षक आमदारकीची मदार ठाणे जिल्ह्यावर
By admin | Published: January 17, 2017 06:10 AM2017-01-17T06:10:19+5:302017-01-17T06:10:19+5:30
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पुन्हा शिवसेना-भाजपा परस्परांत भिडणार आहेत.
ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पुन्हा शिवसेना-भाजपा परस्परांत भिडणार आहेत. या मतदारसंघावर आजवर भाजपा पुरस्कृत उमेदवाराचाच विजय झालेला असला, तरी या वेळी मावळते आमदार रामनाथ मोते यांनी केलेल्या बंडामुळे भाजपाचे कितपत नुकसान होते, यावर सारी गणिते अवलंबून राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असून, माघारीनंतरच लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल. मात्र, निम्मे मतदार ठाणे जिल्ह्यात असल्याने, या जिल्ह्याचाच निवडणुकीवर प्रभाव राहील.
शिक्षक परिषदेने या वेळी रामनाथ मोते यांच्याऐवजी बदलापूर येथील वेणुनाथ कडू यांना उमेदवारी दिली आहे. ते संघटनेचे राज्य व कोकण अध्यक्ष आहेत आणि त्यांना भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक भारतीचे उमेदवार अशोक बेलसरे हेदेखील बदलापूरचे असून, ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. कुळगांव-बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे बंधू ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक सेनेची उमेदवारी मिळाली आहे. या लढाईत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून मोते यांनी रंगत आणली आहे. या चार उमेदवारांव्यतिरिक्त रायगडचे शेकाप पुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
२० जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर, लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, उल्हासनगर येथील आहेत.
या निवडणुकीसाठी ३७ हजार ६४४ मतदार आहेत. त्यातील १५ हजार ७६३ मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. पालघर जिल्हात पाच हजार ११५, रायगडमध्ये दहा हजार नऊ, रत्नागिरीत चार हजार ३२८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन हजार ४५६ शिक्षक मतदार आहेत. (प्रतिनिधी)