शिक्षकांनो मुंबई बँकेत उघडा आपले वेतन खाते !
By admin | Published: July 11, 2017 02:52 AM2017-07-11T02:52:05+5:302017-07-11T02:52:05+5:30
मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत देण्याचा शासन निर्णय ३ जून रोजी झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत देण्याचा शासन निर्णय ३ जून रोजी झाला आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी मुख्याध्यापकांना स्वयंस्पष्ट निर्देश नसल्याने संभ्रमावस्था कायम आहे. हीच संभ्रमावस्था दूर करण्यासाठी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी सर्व शिक्षकांनी मुंबई बँकेत खाते उघडण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकात सर्व शिक्षण निरीक्षकांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खाते मुंबई
बँकेत उघडण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. जेणेकरून १ तारखेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा करण्याची कार्यवाही जुलै महिन्यापासून
सुरू करता येईल. दरम्यान, मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बँकेत खाते उघडल्याची माहिती मुंबई बँकेचे सरव्यवस्थापक डी.एस. कदम यांनी दिली आहे.
कदम म्हणाले की,
शासन निर्णयाची अंमलबजावणी जुलै २०१७ पासून करायची आहे. म्हणजेच जुलै महिन्याचे वेतन आॅगस्ट महिन्याच्या १ तारखेला द्यावे लागणार आहे. मात्र त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी तातडीने उर्वरित खाती उघडण्याबाबत सहकार्य करावे. वेळेत सर्व खाती उघडून झाल्यास नियोजनबद्ध यंत्रणा राबवून १ तारखेस उरलेल्या शिक्षकांना पगार देणे सुलभ होईल.