शिक्षकांचे वेतन आता ‘आॅनलाइन’!
By Admin | Published: May 16, 2014 03:18 AM2014-05-16T03:18:11+5:302014-05-16T03:18:11+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन यापुढे आॅनलाइन होईल़
संजय तिपाले, बीड - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन यापुढे आॅनलाइन होईल़ शिक्षण विभागाच्या शालार्थ योजनेअंतर्गत जून महिन्यांपासून वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे़ जिल्ह्यातील १० हजार शिक्षकांना याचा लाभ होणार आहे़ जिल्हा परिषदेच्या २ हजार २२३ प्राथमिक, तर ५६ माध्यमिक शाळा आहेत़ याशिवाय खासगी प्राथमिक ११५, तर माध्यमिक खासगी शाळांची संख्या ९८ इतकी आहे़ जिल्हा परिषदेत ८ हजार ७६४ शिक्षक कार्यरत आहेत़ खासगी शाळांचे शिक्षक मिळून हा आकडा दहा हजारावर जातो़ आतापर्यंत वेतनाचे बिल मुख्याध्यापकांकडून गटशिक्षणाधिकार्यांकडे येत होते़ त्यानंतर शिक्षण विभागातून ते मंजूर होत असे़ या सर्व प्रक्रियेत वेळ जात होता़ त्यामुळे अनेकदा वेतन हातात पडण्यास विलंब होत होता़ शिक्षकांचे वेतन त्यांना विनाविलंब मिळावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शालार्थ योजना राबविण्यात आली़ त्यानुसार आता शिक्षकांचे वेतन आॅनलाइन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे़ शासनाकडून वेतनाची रक्कम आल्यावर ती आॅनलाईन गटशिक्षणाधिकार्यांच्या खात्यात जमा होईल़ ते वेतनाची रक्कम प्रमाणित करतील़ त्यानंतर वेतन थेट शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे़ आॅनलाइन वेतनासाठी जि़प़च्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून आवश्यक ती माहिती शासनाला कळविण्यात येत आहे़ त्यानंतर शाळेला विशिष्ट कोड क्रमांक दिला जातो़ शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, पॅन कार्ड, आधार कार्ड, एकूण पदमान्यता, सध्या कार्यरत शिक्षकांची संख्या, नावे, त्यांची शैक्षणिक पात्रता, छायाचित्रे, सर्व्हिस बुक आदी माहिती भरून देणे आवश्यक आहे़