शिक्षकांनी परत पाठविले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे; दहावी, बारावीच्या निकालावर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:46 AM2022-03-30T08:46:07+5:302022-03-30T08:46:32+5:30

शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार दिल्याने अनेक गठ्ठे टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. 

teachers sent back the bundles of answer sheets | शिक्षकांनी परत पाठविले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे; दहावी, बारावीच्या निकालावर परिणाम!

शिक्षकांनी परत पाठविले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे; दहावी, बारावीच्या निकालावर परिणाम!

googlenewsNext

मुंबई : विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. राज्य मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिका राज्यातील २५ हजार शिक्षकांनी परत पाठविल्या आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार दिल्याने अनेक गठ्ठे टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. 

राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. ज्या विषयाच्या परीक्षा झाल्या, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. आपल्या मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनाही उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार देत परत पाठविले. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे अनेक गठ्ठे हे बोर्डात, टपाल कार्यालयात पडून आहेत. मुंबईतील दीड ते दोन हजार शिक्षक, कोल्हापूरमधील दोन हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठविले असून, अन्य जिल्ह्यांमधूनही शिक्षक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवीत आहेत.

अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी आगाऊ सूचना महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव, राज्य मंडळ यांना निवेदनाद्वारे दिली होती. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार देत परत पाठविले आहेत. 

कायम विनाअनुदानित शाळांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. निकाल उशिरा लागल्यास त्यासाठी सरकारच जबाबदार असेल.
- संजय डावरे, अध्यक्ष,  विनाअनुदानित कृती समिती, मुंबई

Web Title: teachers sent back the bundles of answer sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.