अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतरांची निवडणुकीतून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 07:09 AM2019-04-13T07:09:40+5:302019-04-13T07:09:42+5:30
उच्च न्यायालयाचा दिलासा; पाच दिवसच करावे लागणार काम
मुंबई : खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामातून सुटका करण्यात आली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा आदेश दिला. यामुळे अनुदानित शाळांतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
मतदार याद्यांच्या कामासाठी राज्यातील शाळांच्या शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाते. निवडणुकीच्या कामांत गुंतवून ठेवले जाते. यामुळे शैक्षणिक व कार्यालयीन कामे ठप्प होतात, शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. आदेशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईच्या धमक्या दिल्या जातात, असा आरोप करून, निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरुद्ध शिक्षण मंडळ, गोरेगाव व अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांच्या पुढाकाराने १0 शाळांच्या चालकांनी २००९ मध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणीवर न्यायालयाने वरील निर्णय दिला. त्यामुळे खासगी अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची निवडणूक कामातून सुटका झाल्याची माहिती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश सामंत यांनी दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने दिलीप बागवे आणि डॉ.वीरेंद्र तुळजापूरकर यांनी बाजू मांडली.
यामुळे अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना यापुढे फार तर पाच दिवसच निवडणुकीचे काम करावे लागेल. \
शिकवायलाही वेळ मिळत नाही
सतत निवडणुका होत असतात आणि त्यासाठी खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सर्रास कामाला लावले जाते. यामुळे शिकविण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याचे शिक्षणसंस्थांचे म्हणणे आहे.