शिक्षकांना निवडश्रेणीसाठी एमए शिक्षणशास्त्र ग्राह्य धरणार
By Admin | Published: July 18, 2016 02:13 AM2016-07-18T02:13:53+5:302016-07-18T02:13:53+5:30
राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी एमए शिक्षणशास्त्र ही पदवी ग्राह्य धरली जाईल,
मुंबई : राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी एमए शिक्षणशास्त्र ही पदवी ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या आदेशाचा फायदा राज्यातील हजारो शिक्षकांना मिळणार आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू आहे. त्यात १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षांनंतर निवडश्रेणी दिली जाते. २४ वर्षांनंतर मिळणाऱ्या निवडश्रेणीसाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. शैक्षणिक पात्रता वाढविणे बंधनकारक असेल, ही त्यातील महत्त्वाची अट होती. त्यानुसार अपदवीधर शिक्षकांनी पदवीधर व पदवीधर शिक्षकांना पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. काही शिक्षकांना नियमित उपस्थिती आवश्यक असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. बी.एसस्सी. झालेल्या शिक्षकांना एम. एसस्सी. पदवी प्राप्त करता येत नसल्याने हजारो शिक्षक निवडश्रेणीपासून वंचित राहत होते. यासाठी अनेक विद्यापीठाने एम.ए.शिक्षणशास्त्र ही शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला. मात्र शिक्षण विभाग निवडश्रेणीसाठी ही पदवी ग्राह्य धरत नव्हते. (प्रतिनिधी)