मतदार जागृतीसह विविध योजनांचा प्रसारही आता शिक्षकच करणार; कामाचा ताण वाढणार!
By रेश्मा शिवडेकर | Published: January 8, 2024 08:57 AM2024-01-08T08:57:15+5:302024-01-08T08:57:39+5:30
परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांना जुंपले कामाला
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे, विद्यादानाचे काम करणे अपेक्षित असताना राज्यभरातील शिक्षकांना त्याऐवजी इतरच कामांना अधिक वेळ द्यावा लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. मतदार जागृतीचे उपक्रम, मराठा समाजातील कुटुंबांचे सर्वेक्षण आदी कामे शिक्षकांकडे सोपविण्यात आल्याने शिक्षकांचे पुढील १५ दिवस अशैक्षणिक कामांतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहावीच्या मुलांच्या सराव, पूर्वपरीक्षा, इतर मुलांच्या घटक चाचण्या, त्यांचा सराव अशी शैक्षणिक कामे तोंडावर असताना शिक्षकांना मात्र त्याऐवजी इतरच कामांना प्राधान्य द्यावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीचे वातावरण आहे. अलीकडेच जळगावात तहसीलदारांनी बैठक घेऊन मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती एका शिक्षकाने दिली. आठवडाभरात एका शिक्षकाने किमान १०० कुटुंबांचे सर्वेक्षण करणे या कामात अपेक्षित आहे. आमच्या शाळेतील चारपैकी तीन शिक्षकांना या कामासाठी घेतल्याची माहिती अन्य शाळेतील एका शिक्षकाने दिली.
हे कामही करायचे‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन विविध प्रकारची माहिती भरण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. ‘लॉग इन’ तयार करण्यापासून १०० गुणांचे ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन भाग शाळांना भरून द्यायचे आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे उपक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य, गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकासाकरिता केले जाणारे प्रयत्न, शाळा परिसराची माहिती पीडीएफ स्वरूपात जोडायची आहे. हे काम शिक्षकांवरच येऊन पडले आहे.
परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांना जुंपले कामाला
‘लोकमत’ने ७ जानेवारीच्या अंकात ‘१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर, शिक्षकांची दांडी’ या मथळ्याखाली वृत्त देऊन विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक परवड ऐरणीवर आणली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी विविध शासकीय योजना, उपक्रमांसाठी शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचे सांगितले.
यासोबत डिसेंबरपासून मतदार जागृतीचे काम शाळेत सुरू असून त्यासाठी किती प्रभातफेऱ्या काढल्या, रांगोळी,वक्तृत्त्व स्पर्धा घेतल्या याची माहितीही सरकारी अधिकाऱ्यांना सादर करावी लागत आहे.
कामांची यादी
दोन दिवस सकाळी १० ते ६ ‘निपुण भारत’चे प्रशिक्षण
‘नवभारत साक्षरता अभियाना’साठी प्रशिक्षण आणि कामे
पंतप्रधानांसमवेतच्या ‘परीक्षा पे चर्चा’साठी किमान ५० टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीची सक्ती
मराठा समाजातील कुटुंबांचे विस्तृत सर्वेक्षणाचे काम. एका शिक्षकाने किमान १०० जणांचे सर्वेक्षण करण्याची सक्ती
‘माझी शाळा, सुंदर शाळे’साठी ऑनलाइन माहिती सादर करणे
मतदार जागृतीसाठी प्रभात फेऱ्या, रांगोळी, वक्तृत्त्व स्पर्धा घेणे