शाकाहारी-मांसाहारी भेद केल्यास धडा शिकवू, मनसेचा बिल्डरांना इशारा
By admin | Published: April 29, 2017 11:14 AM2017-04-29T11:14:22+5:302017-04-29T11:17:51+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील सर्व बिल्डरांना मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी असा भेद करु नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील सर्व बिल्डरांना मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी असा भेद करु नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा दिला आहे. मनसेने यासंबंधी पत्रक काढत आक्रमक भूमिका घेतली आहे.
"आपल्या इमारतीमधील विकण्यात येणा-या सदनिका या कोणत्याही प्रकारचा जातीधर्माचा, आहारात भेदभाव न करता देण्यात याव्यात", अशी मागणी मनसेने पत्रकातून केली आहे. "आमच्याकडे तुमच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून आपण असे न करता सर्व जाती - धर्माच्या लोकांना आपल्या इमारतीमधील सदनिका विकाव्यात", असं मनसेने बिल्डरांना ठणकावून सांगितलं आहे. "इतकंच नाही याबद्दल आम्हाला हमीपत्र द्यावे, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू", असा इशाराच बिल्डरांना देण्यात आला आहे.
मनसे मांसाहाराच्या मुद्यावर आक्रमक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये दहिसरमध्ये मांसाहार करणाऱ्या कुंटुंबाला सोसायटीतील लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी मनसेने आक्रमकपणे हा मुद्दा उचलत आंदोलन केलं होतं. त्यामुळे शाकाहारी-मांसाहारीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनसे आक्रमक होताना दिसते आहे.