पदपथांवरील मुलांना मिळणार शिक्षण
By admin | Published: April 29, 2016 03:28 AM2016-04-29T03:28:36+5:302016-04-29T03:28:36+5:30
देशातील रस्त्यांवर सध्या रहात असलेल्या पाच लाख मुलांसह मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या मुलांसाठी सेव्ह द चिल्ड्रन संस्थेने ‘एव्हरी लास्ट चाइल्ड’ ही मोहीम गुरुवारी मुंबईत सुरु केली.
मुंबई : देशातील रस्त्यांवर सध्या रहात असलेल्या पाच लाख मुलांसह मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या मुलांसाठी सेव्ह द चिल्ड्रन संस्थेने ‘एव्हरी लास्ट चाइल्ड’ ही मोहीम गुरुवारी मुंबईत सुरु केली. या माध्यमातून मुलांना आरोग्याची माहिती आणि शिक्षण देण्यात येणार आहे. याविषयी, संस्थेच्या राज्य कार्यक्रम व्यवस्थापक संध्या कृष्णन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
‘सेव्ह द चिल्ड्रन’च्या मोबाइल लर्निंग सेंटर प्रकल्पावर ही मोहीम बेतलेली आहे. दोन वर्षांत गोवंडी विभागात हा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ७२८ मुलांना वाचन आणि लेखनाचे शिक्षण देण्यात आले. १० मुलांचे गट ८८८ मुलांपर्यंत पोहोचले, त्यांनी या मुलांना बालसुरक्षेच्या संदर्भातील माहिती दिली. त्याचप्रमाणे, १ हजार ४४१ कुटुंबांना त्यांच्या मुलांना जवळच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन केले. ३८२ मुले या माध्यमातून मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये जाऊ लागली.
यावेळी, संध्या कृष्णन यांनी सांगितले की झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्यांवर राहणारी लाखो मुले ‘अदृश्य जिणे’ जगत असतात. त्यांच्या जन्माची कोणतीही नोंदणी सरकारी खात्यांमध्ये नसते. तसेच, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे नसतात. संस्थेच्या माध्यमातून या मुलांच्या नोंदणीसाठी सज्ज असून त्यांची तत्काळ नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा या सेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. (प्रतिनिधी)