टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 06:22 AM2021-07-10T06:22:26+5:302021-07-10T06:23:55+5:30
महाराष्ट्रात जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच केंद्रात टीम नरेंद्रमध्ये गेले या चर्चेकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, टीम देवेंद्रमध्ये कोणकोण आहे हे मला माहिती नाही, पण भाजपमध्ये अशी काही टीम मान्य नाही...
मुंबई : टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असे काही भाजपला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी ही भाजपची संस्कृती आहे. मी, मी असा ‘मी’पणा आमच्या पक्षाच्या संस्कृतीला मान्य नाही. आम्ही, आपण ही संस्कृती भाजपमध्ये आहे आणि तोच संस्कार मुंडे साहेबांनी आम्हाला दिलेला आहे, असे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बहीण प्रीतम यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज असल्याचा इन्कार केला.
महाराष्ट्रात जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच केंद्रात टीम नरेंद्रमध्ये गेले या चर्चेकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, टीम देवेंद्रमध्ये कोणकोण आहे हे मला माहिती नाही, पण भाजपमध्ये अशी काही टीम मान्य नाही. मी भाजपच्या संस्कृतीचा सन्मान करणारी सामान्य कार्यकर्ती आहे. पक्षनिष्ठा ही माझ्या बापाने मला संस्कारात दिलेली आहे. वाजपेयी, अडवाणी, महाजन-मुंडे यांनी शून्यातून पक्ष मोठा करण्यात योगदान दिले. पक्षावर माझे प्रेम आहे आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची संस्कृती काढणे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही, असेही त्या म्हणाल्या.
प्रीतमताईला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी वा ती नाराज नाही. अन्यायाची भावना ही समर्थकांमध्ये असते. लोकांच्या भावना बदलणे हे माझे काम नाही, ते काळानुसार होत राहील. जनता त्यांच्या प्रेमातून नेतृत्वाची उंची तयार करते. आमचं फक्त नाव नाही, वारसा आहे, कर्तृत्व, वक्तृत्वही आहे. प्रीतम यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हीना गावित यांचेही होते. प्रीतमचे नाव योग्यच होते. मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर ती कष्टाळू, हुशार आहे, बहुजन चेहरा आहे या शब्दात पंकजा यांनी बहिणीचे कौतुक केले.
भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. जे प्रमुख व्यक्ती आहेत ते ठरवतात. अनेकांची नावे चर्चेत होती, ती न येता नवीन नावे आली. पक्षश्रेष्ठींनी नवनवीन लोकांना संधी दिली. त्यांच्यात गुण असल्याचे पक्षाला जाणवले असेल व त्यांचा फायदा पक्षाला किती झाला हे भविष्यात कळेल, असे मतही पंकजा यांनी व्यक्त केले.
‘पक्षासाठीच आम्ही कष्ट केले’
मुंडे साहेब पहिल्यांदा निवडून आले तेव्हा जिल्ह्यात आमचा एकही आमदार नव्हता. मी एकटीच सोबत होते. माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून प्रचार केला, असे सांगताना पंकजा यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रीतमताईंना वडिलांच्या मृत्यूनंतर रेकॉर्डब्रेक विजय मिळाला; पण दुसऱ्यांदा त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याची चर्चा होते. पक्षासाठी आम्ही कष्ट केले. आमच्याकडे येणारी गर्दी पक्षासाठीच आहे. मी वेगळी, पक्ष वेगळा असे मी म्हणत नाही; पण दुसरे कोणी म्हणत असेल तर मला काही म्हणायचे नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या, तेव्हाही त्या भावनिक झाल्या.
‘मी कराड यांच्या पाठीशी’
मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मान्य नाही. मी राज्याची महिला नेता, चांगली वक्ता आहे. वंजारी समाजातील व्यक्ती मोठी होत असेल तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. पक्षाने भागवत कराड यांना संधी दिली आहे. मी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचा पक्षसंघटनेसाठी फायदा होईल. भविष्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे, त्यामुळे भविष्यात तेही दिसून येईल.
‘मी तेवढी मोठी नाही’
- पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपविण्याचा डाव आहे, या शिवसेनेच्या मुखपत्रातील टिप्पणीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, भाजपला मला संपवायचे आहे असे मला वाटत नाही.
- मी तेवढी मोठीही नाही की मला संपविण्यासाठी पंतप्रधानांपासून सगळे कामाला लागतील. प्रीतमताईला मंत्रिपद दिले नाही म्हणून ती किंवा मी नाराज नाही. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे.