राज्यातील दुष्काळाची पाहणी न करताच परतले केंद्राचे पथक - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:51 AM2018-12-24T06:51:04+5:302018-12-24T06:51:06+5:30
केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले.
गोंदिया : केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले. त्यामुळे शेतकरी अपेक्षित नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सांगितले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी
होईल. शिवाय मित्र पक्षांना सोबत घेतले जाईल. जागा वाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. काही अडचणी असल्यास दोन्ही पक्षांचे राष्टÑीय अध्यक्ष आपसात बसून सोडवतील. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने वाटाघाटी सुद्धा सुरू आहेत. ताकदीनुसार जागा मिळतील, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खा. प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
महाआघाडीने आम्हाला
गृहित धरू नये- तुपकर
वाशिम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार प्रचंड वाढलेला
असून महाआघाडीत आम्ही सहा जागांवर दावा केला आहे. आम्ही एका जागेवर अजिबात समाधान
मानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये, असे ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी
येथे सांगितले. ‘स्वाभिमानी’ने लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. त्यावर काँग्रेस, राष्टÑवादी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
धानाला २,५०० रुपये हमीभाव देऊ
महाराष्टÑात धानाला केवळ १,७४० रुपये हमी भाव दिला जात आहे. क्विंटलमागे ७०० रुपयांची तफावत आहे. आमचे सरकार आल्यास मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देऊ, असेही पवार म्हणाले.