चार शहिदांना अश्रूपूर्ण निरोप
By Admin | Published: September 21, 2016 05:25 AM2016-09-21T05:25:56+5:302016-09-21T05:25:56+5:30
लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील चार जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील चार जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय...’च्या घोषणांनी शहिदांना अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील शहीद जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील लान्स नाईक चंद्रकांत शंकर गलंडे यांना दुपारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. सैन्यातच असलेले चंद्रकांत यांचे मोठे बंधू मंज्याबापू यांनी मुखाग्नी दिला.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांनाही अंतिम निरोप देण्यासाठी पंतक्रोशीतून लोक आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड येथे विकास जनार्दन कुळमेथे या वीर जवानाच्या पार्थिवाला त्यांचा लहान भाऊ राकेश याने मुखाग्नी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>मुस्लिम बांधवाने दिली अंत्यसंस्कारासाठी जागा
नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक रहिवासी अमिन लाखाणी यांनी त्यांची जागा उपलब्ध करून दिली.