सूर्य पाहिलेल्या माणसाचा 'अस्त'; लागू यांच्या निधनानंतर नाट्यकर्मींच्या डोळ्यांत तरळले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 06:53 AM2019-12-18T06:53:45+5:302019-12-18T06:54:05+5:30
लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकारी नाट्यकर्मींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
पुणे : ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला धक्का बसला.
लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकारी नाट्यकर्मींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने अभिनयाची शाळाच काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांनी अभिनयाचा वस्तुपाठ आणि रंगभूमीचे व्याकरणच प्रत्यक्षात आणले. आपण केवळ मराठीच नव्हे, तर जागतिक रंगभूमीवरचा एक मोठा नट गमावला आहे. परदेशी नाट्यकर्मींच्या तोडीस तोड असा त्यांचा अभिनय होता. शंभूमित्रा, उत्पल दत्त आणि आता लागू हे त्रिकुट काळाआड गेले आहे, अशी प्रतिक्रिया सतीश आळेकर यांनी दिली.
लागू हे विचारवंत आणि अभ्यासू नट होते. त्यांनी कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली. आणीबाणीच्या काळात ठामपणे आपली भूमिका मांडली. 'एक होती राणी' हे नाटक रंगभूमीवर आणले. विजय तेंडुलकर, तसेच आम्हा कलाकारांच्या पाठीशी ते कायम ठामपणे उभे राहिले. त्यांचा अभिनय खूप प्रगल्भ आणि कलाकारांना खूप काही शिकवणारा असायचा. त्यांचे 'सॉक्रेटिस' चे 20 मिनिटांचे स्वगत ज्यांनी ऐकले असेल, त्यांचे आयुष्य सार्थकी लागले असे मला वाटते. गणपतराव जोशी यांच्याप्रमाणे लागू यांच्या अभिनयाच्या, माणुसकीच्या छटा कायम मनावर अधिराज्य करतील, असेही आळेकर म्हणाले.
तर अतुल पेठे यांनी रंगभूमी पोरकी झाल्याचे म्हटले. मी डॉ. श्रीराम लागू यांच्याविषयी इतके लिहिले आहे की त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सुन्न झालो आहे. या शोकमग्न अवस्थेत काहीच बोलणे शक्य नाही, अशा भावन त्यांनी व्यक्त केल्या.
डॉ. श्रीराम लागू यांना महाराष्ट्राने नटसम्राट ही उपाधी दिली. लागू यांच्या कारकिर्दीची सुरुवात हौशी, प्रायोगिक रंगमंचावरून झाली. मात्र, व्यावसायिक रंगभूमीसाठी आवश्यक असणारी शिस्त, कामातील सफाईदारपणा त्यांनी प्रायोगिक रंगभूमीपासूनच अंगी बाणवला. ते अतिशय बुद्धिमान नट आणि तेवढेच संवेदनशील माणूस होते. त्यांचे वाचन अफाट आणि विश्लेषण करण्याची क्षमता विलक्षण होती. जे वाटते ते बोलण्याचे आणि प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय त्यांनी दाखवले. त्यांचे वागण्या- बोलण्यातील आणि विचारांमधील वेगळेपण कायम अधोरेखित व्हायचे. यश, अथवा लोकप्रियता कलाकाराला मिळतेच. मात्र, त्यांना यशाबरोबरच प्रतिष्ठाही मिळाली. असे नट अगदी विरळच. डॉ. लागू यांचे 'लमाण' हे आत्मचरित्र अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या तन्वीर सन्मान पुरस्कारादरम्यान नसिरुद्दीन शाह यांनीही आवर्जून 'लमाण' चा उल्लेख केला. डॉ. लागू यांनी सामाजिक भान जपत सामाजिक कृतज्ञता निधी उभा केला. त्यासाठी 'लग्नाची बेडी' सारखे नाटकाचे प्रयोग केले. त्यांच्याविषयीच्या आठवणींचा पट खूप मोठा आहे, अशा आठवणी माधव वझे यांनी सांगितल्या.