ठाणे-कोपरखैरणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, वाशीच्या दिशेनं जाणा-या वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 06:09 PM2017-09-10T18:09:35+5:302017-09-10T19:44:13+5:30
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ठाणे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे.
ठाणे, दि. 10 - मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ठाणे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे वाशीच्या दिशेनं जाणा-या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ट्रान्स हार्बर कोलमडल्यानं प्रवाशांच्या हालाला पारावार राहिला नाहीये. ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्य मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या कालावधीत, अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला होता, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आला होता.
रेल्वे रुळामधील खडी आणि स्लीपर्स बदलणे, ओव्हरहेड वायरसह सिग्नल यंत्रणेची तपासणी करणे, अशा कामांसाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. याच कामासाठी रविवारी मध्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. यामुळे वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात आली. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या, सकाळी १०.८ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंतच्या लोकलला घाटकोपर, विक्रोळी भांडुप, मुलुंड या स्थानकांत विशेष थांबा देण्यात आला होता. यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचल्या होत्या.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३७ या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेलहून सुटणा-या डाउन लोकल बंद राहिल्या होत्या. याच मार्गावरील अप लोकल सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ या वेळेत बंद होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेया चालविण्यात आल्या होत्या.