बारावी माहिती तंत्रज्ञानाच्या पेपरला तांत्रिक अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 07:34 PM2019-03-16T19:34:14+5:302019-03-16T19:41:19+5:30
बारावीचा माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन परीक्षा सकाळी ११ ते १.३० या वेळेत ठेवण्यात आली होती.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाद्वारे (राज्य मंडळ) घेण्यात येत असलेल्या बारावी माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये लिंक ओपन न झाल्याने काही परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उद्भवली असून त्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८ व २० मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे व मुंबई शहरातील काही केंद्रांवर सर्व्हरच्या बिघाडाचा फटका बसला, मात्र, राज्यात इतर केंद्रांवर माहिती तंत्रज्ञान विषयाची ही परीक्षा सुरळीत पार पडली, असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी सांगितले.
बारावीचा माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन परीक्षा सकाळी ११ ते १.३० या वेळेत ठेवण्यात आली होती. बीएमसीसी येथील परीक्षा केंद्रावर सकाळी अकरा वाजता विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले. मात्र विद्यार्थ्यांचे लॉग इन होऊन लिंकच ओपन होत नव्हती. विद्यार्थ्यांनी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वाट पाहिली. मात्र अखेर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा माहिती तंत्रज्ञान विषयाचा पेपर होऊ शकणार नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
बारावीचा आज शेवटचा पेपर होता. त्यामुळे आज संध्याकाळीच बाहेरगावी जाण्याचे नियोजन अनेक विद्यार्थी व पालकांकडून करण्यात आले होते. मात्र आज अचानक पेपर न होऊ शकल्यामुळे त्यांना त्यांचे सर्व नियोजन रदद् करावे लागले आहे. बारावी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याने पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
.................
ऑनलाइन असल्याने पेपर फुटण्याची भीती नाही
माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा काही विद्यार्थ्यांना देता आली नसली तरी ही परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे पेपर फुटण्याची भीती नाही. या परीक्षेमध्ये प्रत्येक विद्याथ्यार्ला स्वतंत्र पेपर दिलेला असतो. शहरातील ज्या केंद्रावर विद्यार्थ्यांना हा पेपर देता आला नाही, त्यांची परिक्षा सोमवारी (दि. १८ मार्च ) आणि बुधवारी (दि. २० मार्च ) रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी दिली आहे.