‘मातीविना शेती’ हे तंत्र अवलंबावे लागेल
By admin | Published: January 28, 2017 03:32 AM2017-01-28T03:32:04+5:302017-01-28T03:32:04+5:30
उद्योगांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्याने भविष्यात ‘मातीविना शेती’ असा हायड्रोफोनिक शेतीचा प्रयोग
कोल्हापूर : उद्योगांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्याने भविष्यात ‘मातीविना शेती’ असा हायड्रोफोनिक शेतीचा प्रयोग करावा लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
भीमा उद्योगसमूहाच्या वतीने मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘भीमा कृषी - २०१७’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज गहू, साखर, तांदूळ निर्यातीमध्ये आघाडीवर आहे. काळ्या आईची इमानी सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोबदला मिळाला तर काय होऊ शकते, हेच यातून स्पष्ट होते. उद्योग, रस्ते, रेल्वे, धरणांसाठी जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्याने शेतीवर बोजा वाढत आहे. यासाठी शेतीसह इतर क्षेत्रांकडे वळले पाहिजे. ब्राझील, कॅनडातील अनेक गावे निव्वळ भारतीय शेतकऱ्यांची आहेत; त्यामुळे जगाच्या पाठीवर कोणत्याही क्षेत्रात उभे राहण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे.
नोटाबंदीवर सडकून टीका करीत, पवार म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली, दूध व्यवसाय तर पूर्ण अडचणीत आला. काळा पैसा आपल्या खात्यात जमा होईल, या आशेने लोक आतापर्यंत शांत होते; पण आता कुरबूर सुरू आहे. मागील तीन वर्षांत नोव्हेंबर ते जानेवारीत ‘नरेगा’वर ३० लाख मजूर कामावर होते. नोटबंदीच्या तीन महिन्यांत त्यांची संख्या तब्बल ८५ लाखांवर गेली. अनेक कंपन्या बंद पडल्याने लाखो तरुण बेरोजगार झाले.
यावेळी प्रदर्शनाचे संयोजक खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, आमदार हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)