आजाराच्या निदानाला तंत्रज्ञानाची जोड
By Admin | Published: August 16, 2016 04:31 AM2016-08-16T04:31:25+5:302016-08-16T04:31:25+5:30
ठाण्यातील डॉ. अभिषेक सेन आणि डॉ. योगेश पाटील यांनी आजाराच्या निदानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली. पेशाने डॉक्टर असतानाही राज्यातील ग्रामीण भागात फिरताना दिसलेले
- अजित मांडके
ठाण्यातील डॉ. अभिषेक सेन आणि डॉ. योगेश पाटील यांनी आजाराच्या निदानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली. पेशाने डॉक्टर असतानाही राज्यातील ग्रामीण भागात फिरताना दिसलेले भीषण वास्तव पाहून त्यांनी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शोधाची वाट चोखाळली. डॉक्टरी पेशासोबतच आयआयटीमध्ये इंजिनीअरिंग केले. पुढे संस्थेची मुहूर्तमेढ रोवत त्यांनी रक्त, लघवी, रक्तातील साखर तपासण्यासाठी साधी, सोपी उपकरणे विकसित केली. ग्रामीण भागात तातडीच्या निदानासाठी अवघ्या रूपया-दोन रूपयात चाचणी करणारी. आरोग्याला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी निदानाची पद्धतच बदलली.
ठाण्यातील घोडबंदर येथे राहणारे डॉ. योगेश पाटील आणि त्यांचे सहकारी अभिषेक सेन हे नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करीत होते. या काळात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पारोळ आणि भातणी भागात दौरा केला. तसेच मेळघाटामध्ये जाऊन येथील आजारांची माहिती घेतली. साध्या आजारांकडे तेथील सामान्य नागरिक कसे दुर्लक्ष करतात, हे त्या वेळी त्यांच्या लक्षात आले. तेथील नागरिकांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे, आजाराविषयीची माहिती नसणे किंवा एखादी सुई जरी टोचायची झाली तरी त्याची असलेली भीती, यामुळे येथील नागरिकांमध्ये किंबहुना महिलांमध्ये पंडू रोगाची वाढलेली संख्या पाहून या रुग्णांसाठी काहीतरी करायचे, असे ध्येय त्यांनी उराशी बाळगले.
डॉक्टरी पेशात पुढे एमडी किंवा एमबीबीएसची पदवी न घेता त्यांनी विविध चाचण्या करण्याचे साधे, परंतु सोपे तंत्रज्ञान विकसित करण्याचे निश्चित केले. त्यानुसार, २००९ पासून हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आयआयटीमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. यावरच न थांबता त्यांनी तयार करण्यात येणारे तंत्रज्ञान विकता यावे, यासाठी मार्केटिंगचे कौशल्यही शिकून घेतले. यातून पुढे डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी ‘टचबी,’ ‘ब्ल्यू टूथ ग्लुको मीटर’ आणि ‘यू-चेक’ हे तंत्रज्ञान विकसित केले.
‘ब्ल्यू टूथ ग्लुको मीटर’द्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण अगदी वाजवी दरात तपासले जाते. केवळ १० सेकंदांत सुईचा अधिकचा प्रभाव न देता आपल्याला किती शुगर आहे, याची अचूक माहिती या तंत्रज्ञानावर उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे साधारणपणे तीन महिन्यांपर्यंतचा डेटा तुम्हाला मोबाइलवर उपलब्ध होऊ शकत आहे.
‘टचबी’ हे तंत्रज्ञान शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण तपासण्यासाठी वापरले जात आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारची सुई शरीरावर न टोचता हिमोग्लोबीन तपासले जाते. अगदी पूर्वीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर मोबाइलद्वारे तुमच्या डोळ्यांचे फोटो काढले जातात. त्याद्वारे अगदी काही क्षणांत या तंत्रज्ञानावर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण लक्षात येते.
‘यू-चेक’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युरीन टेस्ट केली जाते. अगदी मायक्रो युरीन टेस्टचा रिपोर्टही आपल्याला अगदी काही क्षणांत उपलब्ध होतो. विशेष म्हणजे, तिन्ही तंत्रज्ञाने अॅण्ड्राइड अॅपद्वारे फोनवर कनेक्ट करून देण्यात आली आहेत. त्यामुळे डॉक्टरांना आवश्यक असलेला डेटाही तत्काळ मिळू शकतो. या तिन्ही चाचण्यांसाठी येणारा खर्चही दोन ते पाच रुपयांपर्यंतच आहे. त्यामुळे तो ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारा आहे. विशेष म्हणजे या सर्व तंत्रज्ञानाचे रिपोर्टही आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
आजाराचे निदान ते उपचाराचे
नियोजन अॅपवर आणण्याचा प्रयत्न
आजार ही एक समस्या आहे. परंतु, त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करणे आवश्यक आहे, कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत, किती वेळा केल्या पाहिजेत, आजाराचे निदान झाल्यानंतर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, कसे डाएट केले पाहिजे, कोणता आहार खाणे आवश्यक आहे, किती वेळा जेवण घेतले पाहिजे, वजन, शुगर आदी माहिती आणि एकूणच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भातील आजाराच्या निदनापासून ते थेट उपचारापर्यंतचे नियोजन एका अॅपच्या माध्यमातून देण्याचा मानस या दोनही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. आता त्यावर काम सुरू असल्याची माहिती डॉ. योगेश पाटील यांनी दिली.