तंत्रज्ञानामुळे पुढच्या ३० वर्षांत होणार उद्योगक्रांती
By admin | Published: January 17, 2017 06:14 AM2017-01-17T06:14:33+5:302017-01-17T06:14:33+5:30
तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भौतिक, डिजिटल आणि जैविकमधील रेषा धूसर होत चालल्या आहेत.
मुंबई : तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भौतिक, डिजिटल आणि जैविकमधील रेषा धूसर होत चालल्या आहेत. आता एक नवे जग आकार घेत आहे. यापूर्वी कधीही न आलेला अनुभव तंत्रज्ञानामुळे सर्वांना अनुभवता येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उद्योग-व्यवसायातील अनेक अडथळे सहजरीत्या दूर होत आहेत. गेल्या १० वर्षांत ज्या व्यवसाय-उद्योगांना भरारी घेता येत नव्हती, असे उद्योग आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करू लागले आहेत. त्यामुळेच गेल्या ३०० वर्षांत मानवाने जितके साध्य केले, त्यापेक्षा अधिक पुढच्या ३० वर्षांत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करू शकणार असल्याचे प्रतिपादन उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा १६०व्या दीक्षांत पदवी समारंभ सोमवारी पार पडला. या समारंभाला राज्यपाल विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकेश अंबानी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी स्नातकांना मार्गदर्शन केले.
यंदाच्या समारंभात ३६ विद्यार्थिनींना सुवर्ण पदके, ५८ स्नातकांना पदके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर, दोन कुलपती पारितोषिके आणि एक कुलपती पदकही बहाल करण्यात आले.
अंबानी पुढे म्हणाले, ‘सध्याची तरुण पिढी एका वेगळ््या विश्वात जगत आहे. आयुष्य ही स्पर्धा नसून प्रवास आहे. ही पिढी वचनबद्ध, आशावादी आणि आदर्शवादी आहे. त्यामुळे स्पर्धा करताना स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले व्यक्तिमत्त्व आणि वर्तणूक हे महत्त्वाचे गुण आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा.’
पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश आता आॅनलाइन पद्धतीने होणार असून, शुल्कदेखील आॅनलाइन घेतले जाणार असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले. ते म्हणाले, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत कलिना कॅम्पस आणि ठाण्यातील कॅम्पस आॅडिटोरिअम डिजिटल करण्यात येणार आहेत आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांत ४० व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार
आहेत. (प्रतिनिधी)
>डिजिटल लॉकर
मुंबई विद्यापीठातून यंदा पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डिजिटल लॉकर तयार करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व सटिर्फिकेट्स त्यांना उपलब्ध होणार आहेत. मुकेश अंबानींचा पहिला डिजिटल लॉकर तयार करण्यात आला. या डिजिटल लॉकरमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी त्यांची सर्टिफिकेट मिळणार आहेत.