किशोरवयीन व तरुणपिढीला रक्ताच्या कर्करोगाचा धोका, मोबाइलचा अतिवापर टाळा; कर्करोग तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:01 AM2017-09-04T04:01:38+5:302017-09-04T04:02:07+5:30
साधारण सर्वसामान्य प्रकारचे कर्करोग किशोरवयीन आणि तरुणपिढीत ७ ते १० टक्के प्रमाणात आढळतात. मात्र, रक्ताचा कर्करोग या वयोगटांत होण्याचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे.
मुंबई : साधारण सर्वसामान्य प्रकारचे कर्करोग किशोरवयीन आणि तरुणपिढीत ७ ते १० टक्के प्रमाणात आढळतात. मात्र, रक्ताचा कर्करोग या वयोगटांत होण्याचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. त्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका किशोरवयीन आणि तरुणपिढीत वाढतो आहे, असे निरीक्षण टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. प्रा. तुषार व्होरा यांनी शनिवारी व्यक्त केले.
टाटा मेमोरिअलमध्ये दोन दिवसीय किशोरवयीन आणि तरुणांमधील कर्करोग (ळअउडठ २०१७) या विषयावर ६वी राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ब्रेनट्युमर, ओव्हेरियन कर्करोग, फुप्फुस, छातीचा कर्करोग, डोके-मानेचा कर्करोगही या वयोगटात दिसून येतो. त्यामुळे अशा रुग्णांच्या परिवाराने, नातेवाईक यांनी त्यांच्यासोबत राहणे त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
तर या वेळी टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. श्रीपाद यांनी सांगितले की, बºयाचदा लहान मुलांच्या विभागात या किशोरवयीन मुलांना जागा नसल्याने, त्यांना प्रौढ विभागात दाखल केले जाते. अशा वेळी त्या रुग्णांवरील ताण वाढल्याचे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोरील शारीरिक, मानसिक आव्हानांना तोंड देण्यासाठी समाजात जनजागृती झाली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जागा देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आतापर्यंतच्या संशोधनातून हे दिसून आले की, कर्करोग झालेल्या या रुग्णांच्या वयोगटाकडे काहीसे दुर्लक्ष करण्यात येते. मात्र, या रुग्णांच्या गरजा आणि आव्हाने पूर्ण करणाºया पोषक वातावरणाची गरज समाजात आहे. हे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
मोबाइलचा अतिवापर टाळा; टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला
मोबाइलमुळे आरोग्यावर होणारे परिणाम, याबद्दल अजून संशोधन सुरू आहे. टाटा रुग्णालयात झालेल्या या विषयीच्या परिषदेत कर्करोग तज्ज्ञांनी सल्ला दिला. या वेळी मोबाइलमुळे ब्रेन ट्युमर होऊ शकतो का? या विषयावर चर्चा करण्यात आली. मोबाइलमुळे आरोग्यावर होणारे परिणाम, याबद्दल अजून बरेच संशोधन सुरू आहे. लहान, तरुण आणि प्रौढ व्यक्तींमध्ये मोबाइलचा सातत्याने वापर केला जातो. यासंबंधी ‘टायकॉन’ ही परिषद शनिवारी परळ येथील टाटा रुग्णालयात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण देशातील कर्करोग तज्ज्ञ परिषदेत सहभागी झाले होते.
या परिषदेतील चर्चासत्रात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायन्सेसच्या न्यूरो आॅन्कोलॉजी लॅबचे अधिकारी प्रभारी डॉ.वाणी संतोष सांगतात की, मोबाइलमुळे ब्रेन ट्युमर होतो हे अजून सिद्ध झालेले नाही. मात्र, काही संशोधनानुसार मोबाइलच्या अतिरिक्त वापराने दुसºया किंवा तिसºया टप्प्यातील कर्करोग होण्याचा धोका असतो.
टाटा रुग्णालयातील प्रा. रेडिएशन आॅन्कोलॉजिस्ट डॉ. राकेश जलाली सांगतात की, आपण मोबाइलशिवाय राहू शकत नाही. ही लहान मुले, तरुण आणि प्रौढ व्यक्ती या अधिक प्रमाणात गॅझेट्सवर अवलंबून असतात. मात्र, तरीही मोबाइलच्या वापराविषयी काही टीप्स पाळल्या पाहिजेत. त्यात ५ ते ६ तासांपेक्षा अधिक मोबाइलचा वापर करू नये. मोबाइलची रेंज कमी असल्यास मोबाइलचा वापर करू नये, कान ओले असतील, तर मोबाइलचा वापर करू नये आणि कानाच्या जवळ जास्त वेळ फोन ठेवू नये, यांचा समावेश आहे.