तहसीलदार, बीडीओंसह १३ जणांची चौकशी
By Admin | Published: October 22, 2016 11:44 PM2016-10-22T23:44:20+5:302016-10-22T23:44:20+5:30
गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी एम. एन. वाघ यांच्यासह १३ जणांची
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी एम. एन. वाघ यांच्यासह १३ जणांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सदोष अनुदान वाटपाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि सहकार खात्याच्या सहायक निबंधकांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.
अनुदान वाटपासाठी बनावट शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्याप्रकरणी अव्वल कारकून के. के. जेठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुष्काळी अनुदानापासून अनेक गरजू शेतकरी वंचित असताना, गंगापूर तालुक्यात २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांच्या बनावट याद्या तयार करून सव्वाकोटी रुपयांचे अनुदान लाटण्यात आले होते. ‘लोकमत’ने जुलै महिन्यात वृत्तमालिकेद्वारे हा घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेऊन, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी लेखाधिकाऱ्यांच्या विशेष पथकांमार्फत अनुदान वाटपाची चौकशी केली होती.
अनुदान घोटाळ्याप्रकरणी गवळी शिवराचे तलाठी आय. के. सोनवणे, व्ही. के. कंसार, शिरेसायगावचे तलाठी ज्ञानेश्वर नजन यांना या पूर्वीच निलंबित करण्यात आले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अव्वल कारकून के. के. जेठे यांची सोयगाव येथे तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्हा बँक आणि तहसील कार्यालयातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)
सर्व तालुक्यांची तपासणी
- अनुदान वाटपात झालेल्या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. इतरही तालुक्यांत शेतकरी नसणाऱ्यांना अनुदान दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखाधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, सर्वच तालुक्यांतील अनुदान वाटपाची तपासणी केली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले.