तहसीलदार, भूमिअभिलेख उपअधीक्षक यांनी केला गैरकारभार
By admin | Published: June 10, 2016 01:15 AM2016-06-10T01:15:04+5:302016-06-10T01:15:04+5:30
तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर गैरकारभाराचा आरोप करीत सुपे येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले
बारामती : येथील प्रशासकीय भवनासमोर गुरुवारी (दि. ९) तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर गैरकारभाराचा आरोप करीत सुपे येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. गाव पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून दोन्ही अधिकारी स्वमालकीच्या जागेत महसूल व पोलीस चौकीची जागा दर्शवत असल्याचा आरोप उपोषणकर्ते सतीश भोंडवे यांनी केला आहे.
सतीश भोंडवे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सुपे येथे गट क्र. २११ मध्ये भोंडवे यांनी ७० आर जागा खरेदी केली होती. या जागेची शासकिय मोजणी करून पोटहिस्सादेखील पाडून घेण्यात आला होता. भोंडवे यांची जागा गट क्रमांक २११ मध्ये आहे. मात्र भूमिअभिलेख उपाधिक्षक पाटील व तहसीलदार चव्हाण यांच्यावर गावपुढारी दबाव आणत आहे. महसूलाच्या गाव नकाशामध्येच बदल करून भोंडवे यांच्या गट क्रमांक २११ मध्ये गट क्रमांक २१० मध्ये असणारी पोलीस चौकीची जागा दाखवली गेली आहे. भोंडवे यांनी मालकीच्या ७० गुंठे जागेस शासकीय मोजणी करून कंपाऊंड केले होते. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जेसीपी मशीनच्या साह्याने कंपाऊंड काढून टाकले. या वेळी तहसीलदारांना कंपाऊंड न काढण्याची विनंती केली असता, भोंडवे व त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर भोंडवे यांनी जागेची अतितातडीची मोजणी करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला. या वेळी भूमिअभिलेख उपाधिक्षक पाटील यांनी भोंडवे यांच्याकडे दीड लाख रुपयांनी मागणी केली. यानंतर उपअधिक्षक पाटील यांनी ५० हजार रुपये भरल्यानंतर गट क्रमांक २११ ची मोजणी २००४ पासून अनेक वेळा केल्याचे सांगून हद्द कायम करण्याची गरज नाही, पोटहिस्सा मोजणीचे पैसे भरून पोटहिस्सा पाडून दिला. उपोषणाने न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचाही इशारा भोंडवे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
>जोपर्यंत जागा मिळत नाही,
तोपर्यंत बेमुदत उपोषण
भोंडवे यांनी ७० गुंठे जागेस तारेचे कंपाऊंड केले. यानंतर तहसीलदरांनी ही महसूलची जागा आहे, असे सांगून तारेचे कंपाऊड काढून टाकले.
या कारवाईनंतर भोंडवे उपाधिक्षक पाटील यांना भेटले असता, भोंडवे यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच यापूर्वी तुझ्या जागेची केलेली मोजणी माझ्या अधिकारामध्ये रद्द ठरवली, पुन्हा पैसे भरून मोजणी करा, असे पाटील यांनी सांगितले.
गट क्रमांक सहहिस्सेदारांच्या जागा सातबाराच्या उताऱ्याप्रमाणे आहेत. मग माझीच जागा कोठे गेली. त्या जागेचा शोध लावून द्यावा, जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षकांनी केली दमबाजी
गट क्रमांक २११ मध्ये बेकायदेशिररित्या चक्क पोलीस चौकीचेच बांधकाम करण्यात आले आहे. माझ्या मालकीच्या जागेत पोलीस प्रशासन व महसूल विभाग अतिक्रमण करीत आहे. तर याबाबत वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सतीश शिंदे यांनी दमबाजी केल्याचा आरोपही भोंडवे यांनी केला आहे.