५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार!
By admin | Published: June 3, 2017 03:43 AM2017-06-03T03:43:54+5:302017-06-03T03:44:01+5:30
शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. या आंदोलनात किसान सभेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटू ही कामगार संघटना खांद्याला खांदा लावून उभे असतील, अशी माहिती माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
येचुरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी २ दिवस नाशिक ठप्प केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ६ महिन्यांचा वेळ मागत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, तब्बल एक वर्ष उलटल्यानंतरही शेतमालाला हमीभाव नाही. उत्पादनाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते, त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. फक्त सांप्रदायिक मुद्दे पुढे करून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सद्यस्थितीत देशात दरवर्षी १.५ कोटी सुशिक्षित तरुण महाविद्यालयांतून बाहेर पडत असून, केवळ १.३ लाख रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकार कानाडोळा करत असल्यानेच, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे म्हणाले की, ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी तहसीलदार कार्यालयाचा ताबा घेतील. शेतकरी संपामुळे शहरी भागातील मध्यमवर्गीयांची परवड होत असली, तरी त्याग केल्याशिवाय क्रांती होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनी त्याग करण्यास तयार राहावे. बड्या उद्योगपतींची कर्जे माफ होतात. मग शेतकऱ्यांवरच अन्याय का?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.