तेजसचा तेजोभंग - चांगल्या गोष्टींची आपली लायकी आहे का?

By Admin | Published: May 25, 2017 01:13 PM2017-05-25T13:13:52+5:302017-05-25T14:15:25+5:30

आपल्याला काय काय मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत हे आपण उगाळत असतो, परंतु त्याच राज्यघटनेने ज्या दमात अधिकार दिलेत त्याच दमात कर्तव्यांची जाणीवही करू दिली आहे, हे आपण विसरतो

Tejas Deviation - Is Your Suitable Goods? | तेजसचा तेजोभंग - चांगल्या गोष्टींची आपली लायकी आहे का?

तेजसचा तेजोभंग - चांगल्या गोष्टींची आपली लायकी आहे का?

googlenewsNext
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
तेजस या मुंबई गोवा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या आरामदायी गाडीच्या पहिल्याच फेरीमध्ये अनेक समाजकंटक प्रवाशांनी तोडफोड केल्याचे दिसून आले आहे. एलईडी चोरण्याचा प्रयत्न केला, ते जमलं नाही म्हणून ते फोडले, हेडफोन्स लंपास केले. ही गाडी मुंबईत दाखल झाली तीच मुळी वाटेत लोकांनी मोठ मोठे दगड मारून काचा भंगवलेल्या अवस्थेत. काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला जात असताना, त्याला समाजातल्या विध्वंसकांकडून अशा नाट लावण्याच्या घटना घडतात आणि भारतीय लोकांची लायकी अशा चांगल्या गोष्टींचा लाभ घेण्याची आहे का असा प्रश्न पडतो. जशा जशा चांगल्या गोष्टी आपल्या समाजात घडत गेल्या तसं तसं विध्वंसक आणि अत्यंत खालच्या स्तरावरील वागणुकीचं दर्शनही लगोलग घडत गेल्याचं आपल्याला दिसून येईल.
काही वर्षांपूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्या ट्रेनमधल्या संडासांमध्ये टमरेल ठेवलेलं असायचं. ती टमरेलं लोकं चोरत, म्हणून रेल्वेनं तिला लोखंडी साखळी बांधली, तर साखळीसकट टमरेलं चोरली जायला लागली, म्हणून शेवटी रेल्वेनं संडासांमध्ये टमरेलं ठेवणंच बंद केलं. आता अगदी एसी कंपार्टमेंटचं तिकिट असलं तरी शौचाला जाताना रिकामी झालेली पाण्याची प्लॅस्टिकची बाटली घेऊन जावं लागतं. काही वर्षांपूर्वी रेल्वेतल्या वॉश बेसिनवरच्या आरशांवर असं चक्क मध्यभागी एम्बॉस केलेलं असायचं, की हा आरसा रेल्वेमधून चोरलेला आहे. असं लिहिण्याचा उद्देश एवढाच की कुठल्याही चोरट्याला तो वापरता येऊ नये.
 
 
काही दशकांपूर्वी घर वगळता कुठेही शौचालयांची सोय नव्हती. बस किंवा रेल्वे स्थानकांसारखे मोजके अपवाद वगळता सार्वजनिक शौचालये दुर्मिळ होती आणि रेल्वे किंवा बस स्थानकांमध्ये शौचाला जाण्यापेक्षा काही तास शौचालाच होणार नाही अशा गोळ्या घेण्याकडे लोकांचा कल असायचा. अशा काळात सुलभ शौचालयं सुरू झाली आणि ही गरज बऱ्यापैकी भागली. परंतु, आपण काय केलं तर बसल्या बसल्या दरवाजांवरती विकृत कामशास्त्र लिहिलं, दरवाजांना सिगारेटचे चटके देऊन विद्रूप केलं आणि हिंग लावून न विचारणाऱ्या मुलींचे फोन नंबर कॉल गर्ल्स म्हणून लिहून त्यांचं जगणं नकोसं केलं. चांगल्या शौचालयांची आपण केलेली अवस्था बघून काही भारतीयांची लायकी रेल्वे ट्रॅकच्या किंवा गटाराच्या बाजुला दगड उडवत बसण्याचीच आहे असं वाटलं तर काय चूक?
उठसूठ, भारतीय राज्यघटनेच्या कलमांची उजळणी आपण करत असतो आणि आपल्याला काय काय मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत हे आपण उगाळत असतो, परंतु त्याच राज्यघटनेने ज्या दमात अधिकार दिलेत त्याच दमात कर्तव्यांची जाणीवही करू दिली आहे, हे आपण विसरतो. तेजस एक्सप्रेस सादर करताना रेल्वे अधिकाऱ्यांना वाटलं असेल की लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करू, एलईडी डिस्प्लेवर लोकं गाणी ऐकतिल, मुलं खेळतील. वातानुकूलीत डब्यात त्यांची डोकी शांत राहतील आणि ते शांततेनं प्रवासाचा आनंद घेतील. पण, रेल्वे प्रशासनाला इतक्या अनुभवांवरून लक्षात आलं असेलच की भारतीय प्रवाशांची लायकी फार काही चांगलं द्यावी अशी नाहीये, ते चोचले डेक्कन ओडिशी वगैरेच्या माध्यमातून केवळ पाश्चात्य देशांतील प्रवाशांचे पुरवावेत, कारण कदाचित फक्त त्यांच्यावरच पब्लिक प्रॉपर्टीची कदर ठेवण्याचे संस्कार असतात.

Web Title: Tejas Deviation - Is Your Suitable Goods?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.