‘तेजस’ आज धावणार
By admin | Published: May 22, 2017 04:09 AM2017-05-22T04:09:46+5:302017-05-22T04:09:46+5:30
ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारी, देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरूद मिरवणारी ‘तेजस’ एक्स्प्रेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारी, देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरूद मिरवणारी ‘तेजस’ एक्स्प्रेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे रविवारी शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांनी ‘तेजस’ एक्स्प्रेसचे (मुंबई-करमळी) निरीक्षण केले. त्या वेळी ते म्हणाले की, ‘गेली तीन वर्षे ‘तेजस’ एक्स्प्रेससाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले आहेत.’ प्रवाशांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.मुंबई-करमळी (गोवा) या मार्गावर ‘तेजस’ एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे. सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून ‘तेजस’ करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ‘तेजस’मध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीत ५६ सीट आणि एसी बोगीत ९३६ सीट आहेत. प्रत्येक डब्यात ६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अल्पोपहाराची सेवा पुरवण्यात येणार आहे. आयआरसीटीसीकडून ही सेवा सशुल्क देण्यात येणार आहे. ‘तेजस’मध्ये सायंकाळच्या अल्पोपहारात दाबेली, डाएट चिवडा, सामोसा, कोथिंबीर वडी मिळणार आहे. सकाळी ब्रेड बटरसह उपमा, पोहे, इडली, वडा मिळणार आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सुविधांचे होणार लोकार्पण
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध स्थानकांतील कामे जलद गतीने पूर्ण केली. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांप्रमाणे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेवरील प्रवाशांनाही सोयी-सुविधांचा लाभ मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या दादर, कुर्ला, ठाकुर्ली, कल्याण आणि हार्बरच्या रे रोड, डॉकयार्ड रोड, मानखुर्द, चेंबूर या स्थानकांतील प्रवासी सुविधांचे लोकार्पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार आहे. सीएसटी येथे रूफ टॉप सौरऊर्जा प्रकल्पांचाही यात समावेश आहे.मध्य रेल्वेने सीएसटी येथे रूफ टॉप सौरऊर्जा प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सुरेश प्रभूंच्या हस्ते होणार आहे. ‘मरे’च्या दादर आणि कल्याण मार्गवर दर दिवशी सरासरी ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य, पश्चिम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे दादर स्थानकांतील जिन्यांवर प्रवाशांची गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी पूर्व-पश्चिम दिशेसह मध्य आणि पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या पदपथाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्कायवॉक आणि टिळक पुलाला जोडणारे पादचारी पूल आणि सरकते जिने या प्रवासी सुविधांचे उद्घाटन सुरेश प्रभूंच्या हस्ते होणर आहे. दादरसह कुर्ला, ठाकुर्ली, कल्याण आणि हार्बरवरील रे रोड, डॉकयार्ड रोड, मानखुर्द, चेंबूर, कॉटनग्रीन, वडाळा रोड या स्थानकांवरदेखील सुविधांचे उद्घाटन होणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील स्थानकांवर स्कायवॉक, सरकते जिने, पादचारी पूल, आरक्षण केंद्र आणि शौचालये या कामांचा यात समावेश आहे.