‘भाजप हटाव’चा रस्ता महाराष्ट्रातून जाणार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांचे सक्षम पर्यायावर वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:24 AM2022-02-21T05:24:54+5:302022-02-21T05:26:42+5:30
शरद पवारांशीही राव यांची चर्चा, आपल्या मोहिमेला पवार यांनी आशीर्वाद दिल्याचं वक्तव्य.
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारच्या मुंबई भेटीत भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. देशात भाजपला हटवून परिवर्तन आणण्यावर आणि त्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यावर दोघांमध्ये सहमती झाली. राव हे नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटले आणि आपल्या मोहिमेला पवार यांनी आशीर्वाद दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. देशातील परिवर्तनाचा रस्ता नेहमीच महाराष्ट्रातून जातो, असे सांगत राव यांनी भाजपविरोधी शक्तींना एकत्र आणण्याचे रणशिंग फुंकले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत येऊन शिवसेनेचे नेते व शरद पवार यांच्याशी अशीच चर्चा केली होती. आज मुख्यमंत्री राव यांनी आधी उद्धव यांच्याशी वर्षा बंगल्यावर तर नंतर पवार यांच्याशी सिल्व्हर ओक बंगल्यावर दीर्घ चर्चा केली. राव यांनी सध्या भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी पुढे आलेले राव यांना उद्धव आणि पवार यांचे बळ मिळाल्याचे भेटीनंतर दिसून आले.
तथापि, बेरोजगारी, गरिबी हटविण्यासाठी काय करता येऊ शकेल, याबाबत आमच्यात चर्चा झाली. राजकारणावर नाही, असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या राव यांच्या पुढाकाराला उद्धव यांनी नि:संदिग्ध पाठिंबा दिला असला तरी पवार यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
भाजपला पर्याय देण्याच्या दृष्टीने दोन्ही भेटी महत्त्वाच्या आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती, शिवसेना या प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय राजकारणात जाण्याची महत्त्वाकांक्षा लपलेली नाही. पत्र परिषदेला सेनेचे खा. संजय राऊत, अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. राऊत यांनी पत्र परिषदेची सुरुवात करताना राव यांचा उल्लेख राष्ट्रीय नेते असा केला.
सुडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व नाही
देशात राजकारण गढूळ होत चाललेय. राज्यकारभार दूर राहिला, पण सुडाचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर सुरू झाले आहे. ही देशाची परंपरा नाही आणि हे आमचे हिंदुत्व नाहीच नाही. दुसर्याला बदनाम करण्याचा हा कारभार मोडायला पाहिजे. त्यासाठी एक चांगली दिशा आम्ही ठरवली आहे.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
राजकारणावर फारशी चर्चा झाली नाही
बैठक वेगळ्या विषयावर होती. राजकीय चर्चा फार झाली नाही. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि इतर मुद्दे यातून बाहेर कसे पडता येईल यावर आम्ही बोललो. आता आम्ही इतर विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहोत. सर्वांचे मत जाणून घेतल्यावर संयुक्त बैठक घेऊन अजेंडा मांडू.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
काय म्हणाले चंद्रशेखर राव?
- माझी व ठाकरे यांची अनेक विषयांवर चर्चा आणि सहमती झाली. देशाच्या परिस्थितीत बदल हवा आहे. देशाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आम्ही दोघांनी ठरविले आहे.
- देशातील अन्य राजकीय पक्षांशीदेखील मी चर्चा करीत आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्राची सीमा एक हजार किलोमीटरची आहे. आमचे भावनिक संबंध आहेत. महाराष्ट्रासोबतची मैत्री आम्हाला निभवायची आहे.
- केंद्र सरकार बदल्याचे राजकारण करीत आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास संस्थांचा केंद्राकडून गैरवापर केला जात आहे. उद्या त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
पुढची बैठक कुठे?
उद्धव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राव यांनी भाजपेतर पक्षांच्या नेत्यांची बैठक हैदराबाद येथे होईल, असे सांगितले. पवार यांच्याशी भेटीनंतर मात्र त्यांनी अशी बैठक बहुदा बारामतीत होईल, असे सांगितले.
राव यांनीही काँग्रेसला ठेवले दूर
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असत्या शिवसेना व राष्ट्रवादीच्याच नेत्यांना भेटल्या होत्या.
- राव यांनीही तेच केले. काँग्रेसला वगळून भाजपला पर्याय देता येऊ शकेल, असे वाटते का या पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी आम्ही सगळ्यांशीच चर्चा करणार आहोत, एवढेच सांगितले.