CM एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार? के. चंद्रशेखर राव यांच्या BRSची ठाण्यात होणार एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:52 PM2023-06-19T12:52:07+5:302023-06-19T12:55:12+5:30
K. Chandrashekhar Rao BRS: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात BRS ची एन्ट्री होत असल्याचे सांगितले जात आहे.
K. Chandrashekhar Rao BRS: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्याच्या तयारीत आहे. के. चंद्रशेखर राव यांचा प्रभाव ग्रामीण भागात वाढताना दिसून येत आहे. ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही चंद्रशेखर राव यांचे बॅनर लागल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.
के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हळूहळू पाय रुजवत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांची काळजी वाढू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून, त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यातही वाढ झाली आहे. यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात के. चंद्रशेखर राव यांची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उल्हासनगरमध्ये के. चंद्रशेखर राव यांचे बॅनर
ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरात के. चंद्रशेखर राव यांचे बॅनर लागले आहेत. उल्हासनगरच्या नेताजी चौकात हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या बॅनरच्या बाजूलाच शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समितीच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूरमध्येही भारत राष्ट्र समितीने पक्ष वाढीवर भर दिला आहे.
दरम्यान, बीआरएस पक्षाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय, गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील काही नेत्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे.