'त्याला सांग मी मागेच आहे'; अबू आझमी, रईस शेख पत्रकारांशी बोलत होते, तितक्यात नितेश राणे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:29 IST2023-08-02T14:28:18+5:302023-08-02T14:29:47+5:30
विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधीवेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबु आझमी भिडले होते. यानंतर सभागृहाबाहेरही तूतू मैमै झाली...

'त्याला सांग मी मागेच आहे'; अबू आझमी, रईस शेख पत्रकारांशी बोलत होते, तितक्यात नितेश राणे....
गेल्या काही काळापासून कणकवली-देवगडचे आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी भुमिकेत आले आहेत. त्याचे पडसाद ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्यांतून उमटताना दिसत आहेत. आज विधासभेत सभागृहात आणि सभागृहाबाहेर पत्रकारांसमोर नितेश राणे यांचा आक्रमकपणा दिसून आला आहे.
विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधीवेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबु आझमी भिडले होते. औरंगजेबाचा फोटो लावून काहीजण महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत. वंदे मातरम म्हणणार नाही असं बोलतात. औरंग्या तुमचा बाप आहे अशा घोषणा दिल्या जातात. हे शिवरायांच्या महाराष्ट्रात चालणार नाही. ज्यांना या घोषणा द्यायच्या आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणेंनी खडेबोल सुनावले. हे सांगत असताना राणे अबू आझमींकडे इशारे देत होते.
असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाही. पण मिरवणूक काढली जाते तेव्हा सर तन से जुदा अशाप्रकारे घोषणा देतात. हे लोक गद्दार आहेत. सगळे मुद्दाम घडवले जातेय. औरंग्या तुम्हारा बाप आहे अशा गोष्टी राज्यात चालल्या आहेत. या लोकांनी पाकिस्तानात निघून जावे, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.
यावर सपाचे आमदर अबू आझमी आणि रईस शेख हे सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेत होते. यावेळी रईस शेख यांनी नितेश राणेंनवर टीका केली. गेल्यावेळीही राणेंनी मला गद्दार म्हटलेले. आताही त्यांनी गद्दार म्हटलेय. ही त्यांनी मानसिकता आहे. त्यांच्या डोक्यात हे भरलेले आहे. या मानसिकतेविरोधात लढण्याची गरज आहे, असे शेख म्हणाले.
यावेळी नितेश राणे त्यांच्या मागेच उभे होते. रईस शेख बोलत असताना नितेश राणे यांनी 'त्याला सांग मागे उभा आहे' म्हणून, असे म्हटले. यावर शेख आणि आझमी यांनी मागे वळून पाहिले. तसेच तुम्ही हे बोलला की नाही हे सांगावे असे शेख म्हणाले.
आम्ही अध्यक्षांना सांगणार आहोत पत्र देणार आहोत की नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी. त्यांनी लक्षवेधी लावली आणि आम्ही बोलण्याची मागणी केली परंतु आम्हाला बोलू दिले नाही. आम्हाचे औरंगजेबाच्या बाबतीत काही म्हणणं नाही. परंतु आम्ही बोलण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी आमच्याकडे बोट दाखवलं आणि हे गद्दार आहेत असं सांगितले. नितेश राणेंनी आमची माफी मागावी ही आमची मागणी आहे. पत्र द्यायची ही गरज नाही ते पटलावर आहेत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणीच असेल, असे शेख म्हणाले.