सांगा, कसे शिकायचे? जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 08:13 AM2022-08-17T08:13:54+5:302022-08-17T08:19:26+5:30
सरकारला केव्हा येणार जाग? ट्रायबल फोरमचा सवाल; साडेतीन वर्षे भरती नाही
अमरावती : राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१९ मध्ये उठविण्यात आली. मात्र, साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर`नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी १८ हजारांवर पदे रिक्त आहेत. २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’ आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१९ च्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली.
पावणेदोन लाख डीएड, बीएडधारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात ५० हजारांवर शिक्षकांचा तुटवडा
नगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा येथील रिक्त पदांचा कानोसा घेतल्यास ५० हजारांवर शिक्षकांचा राज्यात तुटवडा आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब, सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षक भरतीला प्राधान्य द्यावे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
ॲड. प्रमोद घोडाम,
संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम
शिक्षकांच्या रिक्त पदांवर नजर...
जिल्हा मराठी उर्दू
अहमदनगर ३४७ २७
अकोला २८८ १२१
अमरावती ३२० ०४
औरंगाबाद ५६९ ९६
बीड ४११ ७५
भंडारा ३०८ -
बुलडाणा १७३ ७६
चंद्रपूर २०४ -
धुळे ३२१ २७
गडचिरोली २६५ -
गोंदिया २९१ -
हिंगोली ८७ -
जळगाव ३६३ १९७
जालना २०३ ३१
कोल्हापूर ९७२ १८
नागपूर ७६९ ०१
नांदेड ७३२ ५६
नंदुरबार ३४५ ३२
नाशिक ५३१ ०३
पालघर १९१६ -
जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची संख्या १८ हजारांवर आहे. रोस्टरनुसार मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाची १३०१ पदे रिक्त आहे.