सांगा कधी करायची ‘नशिबा’ची पेरणी? पाऊस आला, पण अद्याप २५ टक्केच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:51 AM2023-06-27T11:51:16+5:302023-06-27T11:51:33+5:30
Agriculture: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.
पुणे - राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. सर्वाधिक पेरणी नाशिक विभागात झाली असून सर्वांत कमी पेरणी नागपूर विभागात झाली आहे.
राज्यात आतापर्यंत (रविवारअखेर) २ लाख ४७ हजार ९६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. राज्याची सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर इतके असून, एकूण पेरणी झालेले क्षेत्र १.७५ टक्के इतके आहे. येत्या आठवडाभरात राज्यभर दमदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने पेरण्यांच्या टक्केवारीत वाढ होईल, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
विभागनिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कोकण ३८,८५५ । नाशिक १,२३,३८३
पुणे ४७९४ । कोल्हापूर २५,६८२
औरंगाबाद ४१३४ । लातूर ४२०७
अमरावती ४६,६८९ । नागपूर २२३
‘उडीद, मुगाचे आंतरपीक घ्या’
चव्हाण म्हणाले, “उडीद व मूग या पिकांच्या लागवडीचा कालावधी जवळजवळ संपत आल्याने शेतकऱ्यांनी आता सलग पीक घेण्याऐवजी मुख्य पिकात आंतरपीक घ्यावे. त्यामुळे उत्पादनात थोडी घट झाली, तरी ही दोन्ही पिके घेता येतील. कापूस व सोयाबीनच्या लागवडीसाठी वेळ गेलेली नाही.”