आमदारांची नावे सांगा, पाठवून देतो! एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला आव्हान, प्रथमच आले हॉटेलबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:11 AM2022-06-29T08:11:14+5:302022-06-29T08:12:17+5:30
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून १५ ते २० बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत.
मुंबई : गुवाहाटीतील आमदार कोणाच्या तरी संपर्कात असल्याचे दावे खोटे आहेत. स्वार्थासाठी नव्हे तर हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी सर्व आमदार इथे आले आहेत. संपर्कात असल्याचे दावे करण्यापेक्षा नावे सांगा, त्यांना पाठवून देऊ, अशा शब्दांत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंंदे यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून १५ ते २० बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत: शिंदे यांनी मंगळवारी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्लूच्या प्रांगणात प्रथमच येत माध्यमांशी संवाद साधला. आम्ही सगळे एक आहोत. कोणीही ठाकरे यांच्या संपर्कात नाही. त्यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावे सांगावीत, असे आव्हान शिंदे यांनी दिले.
किती वेळा हात जोडायचे - केसरकर
बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, २०-२१ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे उगाच सांगू नका. एक-दोन लोकांची नावे सांगा, त्यांनाही मुंबईत आणून पोहोचवतो. आम्ही मांडलेली भूमिका शिवसेनेच्या हिताची आहे. किती वेळा हात जोडायचे यालाही मर्यादा आहेत.
आम्हाला गद्दार म्हणण्याचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागले. डुक्कर, मेलेली प्रेत, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागले, तर ते कोण सहन करणार?, असा प्रश्न उपस्थित करत दीपक केसरकर यांनी आणखी किती सहन करायचे असा प्रतिप्रश्न केला.
आदित्य यांच्या तोंडी राऊतांची भाषा शोभत नाही. आदित्य ठाकरे सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे आम्ही आशेने पाहतो. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून संयमित भाषा शिकावी. त्यांच्या तोंडी संजय राऊत यांची भाषा शोभत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीस यांनी या डबक्यात उतरू नये - संजय राऊत
- ज्या प्रकारचे डबके सध्या राजकारणात झाले आहे त्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने उतरू नये. या डबक्यात उतरून त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या पक्षाची, पंतप्रधान मोदींची आणि देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल, असे माझे स्पष्ट आणि परखड मत आहे. मला खात्री आहेत ते या डबक्यात उडी मारणार नाहीत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले.
- शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली राजकीय घडामोड, ईडीने पाठविलेली नोटीस या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राजकीय टोलेबाजी चालूच ठेवली आहे. सध्या राजकीय वातावरणात बदल सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे ११६ आमदारांचे बळ आहे. हा विरोधी पक्ष विधायक काम करुन महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो.
- फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे. पण त्यांनी या डबक्यात उतरू नये, असा एक मित्र म्हणून माझा सल्ला आहे, असे राऊत म्हणाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आसामचे वातावरण एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे ११ जुलैपर्यंत त्यांना आसाममध्ये आराम करायचा आहे. त्यांचे महाराष्ट्रात काही काम नाही, असे ते म्हणाले.