सांगा, आम्ही कसं शिकायचं?
By Admin | Published: July 22, 2016 12:57 AM2016-07-22T00:57:58+5:302016-07-22T00:57:58+5:30
वाशिम जिल्ह्यात नियमितपणे कॉलेज भरत नाहीत, लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना खासगी क्लासमध्ये शिक्षण घ्यावे लागते;
पुणे : वाशिम जिल्ह्यात नियमितपणे कॉलेज भरत नाहीत, लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना खासगी क्लासमध्ये शिक्षण घ्यावे लागते; त्यामुळे मी पुण्यात शिकायला आलो. माहिती नसल्याने अकरावीचा आॅनलाईन अर्ज भरू शकलो नाही. सोमवारपासूनच पुण्यातील अकरावीचे कॉलेज सुरू झाले आहे. मात्र, मला प्रवेश मिळत नाही. सांगा, मी कसं शिकायचं, असा गंभीर करणारा सवाल एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
अकरावी प्रवेशाच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थी व पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन करीत आहेत. ‘आम्हाला घराजवळ प्रवेश मिळाला पाहिजे. मुलींच्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे,’ अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन विद्यार्थी व पालक शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यातून आलेल्या शुभम सोमटकर याची माफक अपेक्षा आहे, की ज्या कॉलेजमध्ये दररोज शिक्षकांकडून शिकवले जाते अशा कोणत्याही कॉलेमध्ये प्रवेश मिळावा.
शुभम म्हणाला, ‘‘मला दहावीत ७४.८० टक्के गुण आहेत. वाशिम जिल्ह्यात बहुतांश सर्व कॉलेज केवळ अर्धा-एक तास चालतात. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन लाखो रुपये खर्च करून खासगी क्लास लावले जातात.’’
>माझ्या मुलाला ८३ टक्के गुण आहेत. तसेच त्याने टेक्निकलविषयाचेही शिक्षण घेतले आहे. त्याच प्रमाणे अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेण्यासही तो पात्र होता. परंतु,त्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे कॉलेज मिळाले नाही.- रहिम शेख, पालक