आम्ही राहायचे कुठे ते सांगा?
By admin | Published: June 13, 2016 03:40 AM2016-06-13T03:40:34+5:302016-06-13T03:40:34+5:30
तोडलेल्या इमारती, जुनी घरे, गाळेधारकांना पर्यायी जागा देण्याच्या प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या वल्गना निव्वळ भूलथापा ठरणार आहेत.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेदरम्यान तोडलेल्या इमारती, जुनी घरे, गाळेधारकांना पर्यायी जागा देण्याच्या प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या वल्गना निव्वळ भूलथापा ठरणार आहेत. बेघरांनी पालिकेकडे पर्यायी जागा वा पुनर्वसनाची मागणी केली आहे. परंतु, पालिकेकडे निव्वळ पाच सदनिकाच उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे बेघर नागरिकांना पुनर्वसनापासून वंचित राहावे लागणार आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात सुरू केलेली रस्ता रुंदीकरण मोहीम सुरुवातीपासूनच मनमानी व नियमबाह्य पद्धतीने केली जात आहे. काँग्रेससह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही पालिकेच्या हुकूमशाहीविरोधात संताप व्यक्त केला आहे. महामार्ग परिसर, पेणकरपाडा, मीरागाव, काशीगाव, मुन्शी कम्पाउंड, भार्इंदर पूर्वेचा फाटक मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा जोतिबा फुले मार्ग, स्टेशन रोड या ठिकाणी पालिकेने अगदी ग्रामपंचायत काळापासूनच्या जुन्या इमारती, दुकाने, औद्योगिक गाळे नियम धाब्यावर बसवून तोडकाम सुरू केले आहे. यामध्ये नागरिक बाधित झाले असून त्यांचे अद्यापकुठेही पुनर्वसन केलेले नाही. त्यांना मोबदलादेखील मिळालेला नाही. वास्तविक, पुनर्वसन वा मोबदला नेमका काय द्यायचा, याबाबतचे पालिकेचे अद्याप धोरणच ठरलेले नाही.
केवळ पोकळ आश्वासने देऊन पालिका नागरिकांना बेघर करत असून बाधित रहिवाशांना भविष्यात मोबदला मिळण्याची शक्यताही कमीच आहे. पालिकेला बेघरांसाठी आतापर्यंत केवळ १४१ सदनिकाच मिळाल्या आहेत. त्यापैकी सध्या केवळ २७ रिक्त असून त्यातही मुन्शी कम्पाउंडमधील १०, तर पेणकरपाडा येथील १२ अशा २२ बाधितांना दिल्या जाणार आहेत. यामुळे पालिकेकडे केवळ पाच सदनिकाच शिल्लक राहणार आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरयोजनेतून मिळालेल्या ६३२ घरांमध्ये आधीपासूनच धोकादायक इमारतीतील रहिवासी तसेच बीएसयूपी योजनेतील रहिवासी राहत आहेत. तर, दुकाने वा गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे कोणताच पर्याय नाही. (प्रतिनिधी)
>पालिकेकडे आकडेवारीच नाही
रस्तारुंदीकरणात किती बांधकामे तोडली, त्यात निवासी व व्यापारी किती, याची कोणतीही आकडेवारी पालिकेने अद्याप एकत्रित केलेली नाही. दुसरीकडे घरे, दुकाने तुटली म्हणून बाधितांनी पालिकेकडे अर्ज-विनंत्या सुरू केल्या असून त्याची संख्या शेकडोंच्या घरात आहे.
>‘१८ ऐवजी १५ मीटर रस्ता करा’
भार्इंदर पूर्व परिसरातील इमारती या ग्रामपंचायत काळापासूनच्या आहेत. अस्तित्वात असलेल्या इमारतींचा विचार न करताच १९९७ मध्ये विकास आराखडा मंजूर केल्याने सध्या येथे १८ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेली कारवाई थांबवावी. महासभेत १५ मीटर रस्ता ठेवण्याचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी महापौर गीता जैन यांना केली आहे. तर, दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी पाटील यांची मागणी फेटाळली आहे. आदल्या रात्री लाल पट्टे मारून जायचे व दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तात फौजफाटा घेऊन इमारत पाडायची, अशी मोगलाई सुरू आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.