Cold Wave In Maharashtra: गारेगारsss गारेगारsss...! राज्य गारठणार; नाताळात थंडी कहर करणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:19 PM2022-12-15T12:19:22+5:302022-12-15T12:19:45+5:30
सध्या प्रवासात असलेले व पाकिस्तानपर्यंत पोहोचलेले पश्चिमी झंझावात येत्या ३-४ दिवसांत काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडात दाखल होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तुर्कस्तान, युक्रेन, भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यातून उगम पावलेला पश्चिमी झंझावत पाकिस्तानपर्यंत पोहोचला असून, येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तो काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात दाखल होईल आणि त्यानुसार आपल्याकडे पुन्हा एकदा सोमवारपासून थंडीला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे ही थंडी नाताळपर्यंत टिकून राहील. त्यामुळे यंदाचा नाताळ दरवर्षीप्रमाणे यंदाही कुडकुडणार आहे.
सध्या प्रवासात असलेले व पाकिस्तानपर्यंत पोहोचलेले पश्चिमी झंझावात येत्या ३-४ दिवसांत काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडात दाखल होईल.महाराष्ट्रात त्याचदरम्यान मॅन-दौंस वादळातील ढगाळ वातावरणाचा प्रभाव नामशेष होईल. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच सरासरीपेक्षा ५ अंशांनी वाढलेल्या किमान तापमानात हळूहळू तेवढीच घसरण होऊन सोमवारपासून थंडीत वाढ होईल, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
झंझावात म्हणजे काय ?
झंझावात म्हणजे उत्तरेकडील जमिनीवरचे चक्रीवादळ होय. झंझावाताला पश्चिमी प्रक्षोभदेखील म्हणतात. यामुळेच बर्फ, पाऊस, थंडी आणि धुके येत असते.
येत्या २ ते ३ दिवसांत मध्य भारतातील किमान तापमानात २ ते ३ अंशांची घसरण होईल. त्यानंतर मात्र फार काही बदल होणार नाहीत. तर पुढील २४ तासांत उत्तर भारतातील किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घसरण होईल.
- हवामान विभाग