संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:25 AM2018-05-07T04:25:35+5:302018-05-07T04:25:35+5:30
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुणे - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे जोरदार पाऊस होत आहे़ पश्चिम बंगाल, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, रायलसीमा, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरळ येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
७ ते १० मे दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ७ ते १० मेदरम्यान विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़
राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे ४०़२, लोहगाव ४१़३, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४४़४, नाशिक ३९़३, सांगली ३९़९, सातारा ४१़१, सोलापूर ४२़६, मुंबई ३४़२, सातांक्रूझ ३४, अलिबाग ३६़४, रत्नागिरी ३३़४, पणजी ३५़१, डहाणू ३४़७, औरंगाबाद ४१़६, परभणी ४४, अकोला ४५़१, अमरावती ४४, बुलडाणा ४१़५, ब्रह्मपुरी ४५़१, चंद्रपूर ४४़६, गोंदिया ४२़५, नागपूर ४३़७, वर्धा ४४़९, यवतमाळ ४३़५़़़
अमरावतीत उष्माघाताचे तीन बळी
अमरावती : पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला असून उष्णतामानामुळे शनिवारी तीन जण मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वैद्यकीय प्रशासनाने वर्तविली आहे.
शनिवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इर्विन रुग्णालयाच्या फुटपाथवर एका ७० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. गाडगेनगर हद्दीतील शेतशिवारात अनिल हिंमत सिरसाठ (४०) हे मृतावस्थेत आढळून आले. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. बडनेरा हद्दीतील शिवारात शैलेश शंकर देव्हारे (३०) यांचा मृतदेह आढळून आला. तिन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल.
मुंबईत दिवसा उनं रात्री उकाडा
मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुंबई तापत आहे. उष्ण, कोरडे वारे मुंबईकरांना तापदायक ठरत असून, ऊकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. दिवसा ऊनं आणि रात्री ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबई त्रस्त आहे. सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील; आकाश अंशत: ढगाळ राहील. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.