राज्याचे तापमान दोन अंशांनी वाढले; विदर्भासह मराठवाड्यात हलक्या सरी बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:00 AM2019-08-20T06:00:32+5:302019-08-20T06:00:45+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य भारतात कोसळत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला असतानाच दुसरीकडे राज्यातील तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. सर्वसाधारण तापमानात २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, २३ आणि २४ आॅगस्टदरम्यान विदर्भासह मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसानंतर आता राज्यातील पावसाच्या तीव्रतेत लक्षणीय घट झाली आहे. वस्तुत: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये कोरडे हवामान आहे. पावसाअभावी तापमानात वाढ झाली असून मुंबईमध्ये दमट वातावरण आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊन वातावरण जवळजवळ कोरडे राहील. उत्तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी कमी होतील. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. दक्षिणेकडील जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात मध्यम पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र
झारखंड आणि त्यालगतच्या पश्चिम बंगालजवळील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेने प्रवास करून देशाच्या मध्य भागावर येईल. या हवामान प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागांत पावसाचे प्रमाण वाढेल.
मुंबईत वातावरण राहणार कोरडे
पुढील तीन ते चार दिवस मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊन वातावरण जवळजवळ कोरडे राहील. मुंबई आणि उपनगरासह उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी होईल.
आज कोकण, गोव्यात पाऊस
२० आॅगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
२१ आॅगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.
२२ आणि २३ आॅगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
मुंबईत आकाश ढगाळ
२० आणि २१ आॅगस्ट : शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
शहरांचे सोमवारचे कमाल तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
मालेगाव ३२.४
पुणे ३०.६
रत्नागिरी ३०.२
उस्मानाबाद ३२.२
सांताक्रुझ ३१.२
जळगाव ३२
अलिबाग ३२.७
कोल्हापूर २९.८
परभणी ३४
बारामती ३२.७
सांगली ३०.६
चिखलठाणा ३२.२