स्थिर कमाल तापमानासह कडक उन्हाचा मुंबईला ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:00 AM2019-04-11T06:00:34+5:302019-04-11T06:00:36+5:30
हवामान विभाग : कोकण, गोव्यात राहणार हवामान कोरडे
मुंबई : मुंबईचे सरासरी कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, आर्द्रताही ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. परिणामी, कमाल तापमानाचा स्थिर पारा, चटके देणारे ऊन अशा ‘ताप’दायक वातावरणामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. गुरुवारसह शुक्रवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहून संध्याकाळसह रात्री ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता
११-१२ एप्रिल : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
१३ एप्रिल : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
१४ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
बुधवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर ४२.३
अकोला ४३
अमरावती ४२.६
औरंगाबाद ४०
बीड ४१.७
बुलडाणा ४०.६
चंद्रपूर ४३.८
गोंदिया ४०.८
जळगाव ४२.६
जेऊर ४०
मालेगाव ४२
मुंबई ३३.१
नागपूर ४३.६
नांदेड ४३
उस्मानाबाद ४१.६
परभणी ४२.९
सांगली ४०.८
सोलापूर ४२.६
वर्धा ४३
यवतमाळ ४१.६