मंदिरांतील चोऱ्या वाढल्या
By admin | Published: December 22, 2015 01:56 AM2015-12-22T01:56:11+5:302015-12-22T01:56:11+5:30
गेल्या वर्षभरात राज्यातील मंदिरांतील चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे; तर दुसरीकडे गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख ९ टक्क्यांनी घसरला आहे.
जमीर काझी, मुंबई
गेल्या वर्षभरात राज्यातील मंदिरांतील चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे; तर दुसरीकडे गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख ९ टक्क्यांनी घसरला आहे. १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ४३३ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातून तब्बल १ कोटी १९ लाख ९९ हजार ४१० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पैकी केवळ १०८ गुन्हे पोलिसांना उघडकीस आणता आले आहेत.
२०१४मध्ये याच कालावधीत ४१५ गुन्हे घडले होते. त्यामध्ये १ कोटी ११ लाख ९७ हजार ९७ रुपयांचा
ऐवज चोरीला गेला होता. यापैकी १४१ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले होते. गेल्या पाच वर्षांत राज्यातील लहान-मोठ्या तब्बल २ हजार २८७ मंदिरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून ७ कोटींवर ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांना त्यापैकी जेमतेम २४ टक्के गुन्ह्यांचा शोध लावणे शक्य झाले आहे. या चोरट्यांकडून १ कोटी ३८ लाखांचा ऐवज वसूल करण्यात आला आहे.
देणगीच्या स्वरूपातून मंदिरांमध्ये मोठी रक्कम जमा होत असल्याने चोरटे मंदिरांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. मूर्ती, दानपेटी किंवा देवळातील किमती साहित्य पळवून नेण्याचा फंडा चोरट्यांनी आत्मसात केला आहे. बॅँका व बंगले तसेच फ्लॅट फोडण्यापेक्षा मंदिरे त्यांच्यासाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत असल्याचे वरिष्ठ पोलिसांकडून सांगण्यात आले.