देवाचे दार उद्या उघडणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:38 AM2020-11-15T05:38:38+5:302020-11-15T05:40:07+5:30

Temple to be opened in Maharashtra: प्रार्थनास्थळांमध्ये शिस्त पाळण्याचे जनतेला आवाहन. गेले अनेक दिवसांपासून राज्यातील विविध संप्रदाय, धार्मिक संघटना यांनी मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी लावून धरली होती.

temple door's will open tomorrow! CM Uddhav Thackeray's announcement | देवाचे दार उद्या उघडणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

देवाचे दार उद्या उघडणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाडव्यापासून (सोमवार) राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. गेले अनेक दिवसांपासून राज्यातील विविध संप्रदाय, धार्मिक संघटना यांनी मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी लावून धरली होती.


यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुरवधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. आता धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ही शिस्त पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

...ही ‘श्रीं’ची इच्छा समजा!
मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका.
मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील. हा फक्त
सरकारी आदेश नसून श्रींची इच्छा
समजा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.



भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना
मुंबई - धार्मिक स्थळे सोमवारपासून उघडण्याची अनुमती देताना शासनाने त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. स्थळांमधील मूर्ती, पुतळे, धर्मग्रंथांना हात लावण्याची अनुमती भाविकांना नसेल. दूरुन दर्शन घ्यावे लागेल. व्यवस्थापन ठरवेल त्या वेळेनुसार ती उघडी राहतील. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळेच उघडली जातील. इथे जाताना मास्क घालणे, सॅनिटायजर/हँडवॉशचा वापर, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था अनिवार्य असेल. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन सुरक्षिततेसाठी काही नियम लागू करू शकतील.


ऑनलाइन बुकिंग सक्तीचे
शिर्डी : राज्य सरकारने येत्या पाडव्याला (सोमवार) साई मंदिर उघडण्याचा निर्णय घेऊन भाविकांना दिवाळी भेट दिली आहे. पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डीबाहेरील भाविकांनी ऑनलाईन
पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे, अशी माहिती संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी दिली.  
 

Web Title: temple door's will open tomorrow! CM Uddhav Thackeray's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.