एसटीमध्ये २०१९ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:37 PM2020-07-17T21:37:31+5:302020-07-17T21:37:56+5:30

लॉकडाऊन कालावधीमध्ये एसटी महामंडळाची प्रवासी सेवा ठप्प आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Temporary adjournment for employees recruited in state transport in 2019 | एसटीमध्ये २०१९ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती स्थगिती

एसटीमध्ये २०१९ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती स्थगिती

Next

मुंबई : सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदामध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने शुक्रवारी घेतला आहे. मात्र एसटी कर्मचारी संघटनेकडून या निर्णयाबाबत विरोध करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये एसटी महामंडळाची प्रवासी सेवा ठप्प आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. सामान्य जनजीवन सुरळीत होऊन एसटीची प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईपर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पूर्णपणे प्रवासी वाहतूक होत नसल्याने, वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी उपलब्ध आहेत.

सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक आणि वाहक पदामध्ये रोजंदार गट क्रमांक १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात यावी. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार व चालविण्यात येणाऱ्या नियतानुसार आवश्यकता असल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार पुन्हा घेण्यात येईल.

सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक- टंकलेखन, राज्यसंवर्ग व अधिकारी पदामध्ये व अनुकंपा तत्वावर उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास त्या उमेदवारांचे प्रशिक्षण शुक्रवारपासून तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावे. कार्यवाहीचा सविस्तर अहवाल शनिवारी सादर करण्यात यावा, असे परिपत्रक एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे.

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवर जाहिरात काढून भरती करण्यात आलेली तर, मग आता सेवा तात्पुरती खंडित कशासाठी करता ? सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तत्काळ मागे घ्यावा.- मुकेश तीगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

२०१९ पासून भरती झालेले चालक तथा वाहक या पदावरील कर्मचारी आपल्या पहिल्या नोकऱ्या सोडून एसटी महामंडळात रुजू झालेले आहेत. तेव्हा या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. अनुकंपा तत्वाची नोकरी हि एसटीचा कर्मचारी दिवंगत अथवा कायमचा जायबंदी झाल्यावर त्याच्या वारसाला ते कुटुंब जगवण्यासाठी ती नोकरी दिलेली असते. परंतु, त्याचेही प्रशिक्षण अथवा नोकरी थांबविणे, अत्यंत अन्यायकारक आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी महामंडळाकडून ८ हजार २२  भरती चालक तथा वाहक पदाची जाहिरात होती. यापैकी ४ हजार ५०० पात्र कर्मचार्यांना भरती करण्यात आले. यापैकी १ हजार ३०० कर्मचारी कामावर रुजू झाले होते. तर, ३ हजार २०० कर्मचारी प्रशिक्षक होते. त्यामुळे या सर्वानावर उपासमारीची वेळ येणार आहे, असे मत कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करण्यात आले.

Web Title: Temporary adjournment for employees recruited in state transport in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.