तात्पुरते शेड्स न काढणाऱ्यांना परवानगी नाही

By admin | Published: June 8, 2017 02:28 AM2017-06-08T02:28:23+5:302017-06-08T02:28:23+5:30

गेल्या वर्षी पावसाळ्याच्या काळात उभारलेले तात्पुरते शेड्स ज्यांनी हमी देऊनही ३१ आॅक्टोबर २०१६पर्यंत काढून टाकले नाही

Temporary non-takedown shades are not allowed | तात्पुरते शेड्स न काढणाऱ्यांना परवानगी नाही

तात्पुरते शेड्स न काढणाऱ्यांना परवानगी नाही

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी पावसाळ्याच्या काळात उभारलेले तात्पुरते शेड्स ज्यांनी हमी देऊनही ३१ आॅक्टोबर २०१६पर्यंत काढून टाकले नाही, त्यांना या वर्षी तात्पुरते शेड उभारणीसाठी परवानगी देऊ नये, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला आयुक्त अजय मेहता यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
दरवर्षी पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक हॉटेल्स, दुकाने, कार्यालये, घरे अशा विविध आस्थापना तात्पुरत्या शेड्स उभ्या करत असतात. त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांकडून रीतसर परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना संबंधितांनी हे शेड्स पावसाळा संपल्यानंतर ३१ आॅक्टोबरपर्यंत काढून टाकणे बंधनकारक असते. तरीही काही ठिकाणी या शेड्स तशाच उभ्या असतात. याची गंभीर नोंद घेऊन ३१ आॅक्टोबर २०१६पर्यंत या तात्पुरत्या पावसाळी शेड्स काढून न टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच या वर्षापासून त्यांना तात्पुरत्या शेड्ससाठी परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
विभाग कार्यालयातील संबंधित साहाय्यक अभियंत्यांना यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यात ज्यांना परवानग्या देण्यात आल्या त्यांची नावे आणि इतर तपशील याची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
विभागीय कार्यालयाच्या इमारत व कारखाने खात्यातील संबंधित ‘बीट अधिकारी’ यांनी त्यांच्या भागातील तात्पुरत्या पावसाळी शेड्ससाठी परवानगी दिलेल्या आस्थापनांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत शेड्स काढली आहेत किंवा नाहीत याची पाहणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या आस्थापनांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत शेड्स काढली नसतील त्यांची नावे नोंदवहीमध्ये नोंदविण्यात यावीत. ज्याआधारे पुढील वर्षी या आस्थापनांना परवानगी नाकारता येऊ शकेल; शिवाय संबंधित विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी पावसाळा संपल्यानंतर हे तात्पुरते शेड्स काढले जातात किंवा नाही याचा आढावा घेऊन नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Temporary non-takedown shades are not allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.